पुरंदर, भोर, बारामती तालुक्‍यांत मोठी हानी

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची माहिती

पुणे – पुरंदर तालुक्‍यात अतिवृष्टीमुळे दोघांचा मृत्यू झाला असून 700 पेक्षा अधिक जनावरे दगावली आहेत. पुरंदर, भोर, हवेली आणि बारामती तालुक्‍यांत मोठी हानी झाली असून, शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून, बचाव व मदतीसाठी एनडीआरएफची 5 पथके कार्यरत असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या पावसाचा फटका जिल्ह्यातील 15 तालुक्‍यांपैकी 5 तालुक्‍यांना बसला. बारामती तालुक्‍यातील आंबी खुर्द आणि बुद्रुक, माळवाडी यासह 21 गावे, पुरंदर तालुक्‍यातील 24 आणि भोर तालुक्‍यातील 1 गावांना या पावसाचा फटका बसला आहे.
पुरंदर तालुक्‍यातील नाझरे धरणातून कऱ्हा नदीत 85 हजार क्‍युसेकने विसर्ग सोडण्यात आला. त्याचा फटका बारामती शहराला बसला असून, दक्षतेचा उपाय म्हणून बारामती शहरात 38 निवारा शिबिरांची उभारणी केली आहे. रात्री 15 हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. परंतु, त्यातील अनेक नागरिक नातेवाईकांकडे राहण्यासाठी गेले. त्यामुळे सध्या या शिबिरात 2 हजार 500 नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

जिल्ह्यात एनडीआरएफच्या 5 टीम तैनात
जिल्ह्यात 5 एनडीआरएफच्या टिम तैनात करण्यात आल्या असून 275 जवान मदत कार्य करत आहेत. त्यापैकी बारामती तालुक्‍यात एनडीआरएफच्या 2 टीम कार्यरत आहेत. तर पुरंदर आणि पुणे शहरासाठी प्रत्येकी 1 आणि अन्य भागासाठी 1 टीम तैनात केली आहे. या आपत्कालिन स्थितीची माहिती निवडणूक आयोगाला कळवून त्यांच्या सूचनांनुसार प्रशासनाच्यावतीने बाधित नागरिकांना मदत देण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.