निगडी – निगडी येथील पोलीस चौकीजवळील लहूजी झोपडपट्टीतील गरीब कुटुंबातील पायल राजू काळभोर हिने स्वत:ची गरिबीची परिस्थिती असतानाही आपल्या खाऊसाठी साठवून ठेवलेल्या पैशातून झोपडपट्टीत राहणाऱ्या लहान मुलांना बिस्किट वाटून मुलांना आनंदीत केले.
या झोपडपट्टीतील लहान मुलांची उपासमार होताना तिने पाहिले. आपले मामा अक्षय सिताराम आरे यांना लहान मुलांना बिस्किट वाटपाची कल्पना दिली. त्यांनीही संमती देऊन तिच्याजवळ असलेले पैसे बिस्किटासाठी खर्च केले. दोघांनी या परिसरातील 40-50 मुलांना बिस्कीटे वाटली. या झोपडपट्टीतील मुलांच्या आई-वडिलांनी पायलचे कौतुक करीत आहेत.
शेजारी पोलीस चौकीतील पोलीस बांधवही त्यांना किराणा माल पुरवितात. अन्न पाकीटे देतात. सध्या “करोना व्हायरस’ने धुमाकूळ घातला आहे. हातावर पोट भरणाऱ्यांचे हाल होत आहेत. सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून या लहान मुलीने सहभाग घेतला. तिला आई वैशाली काळभोर, राजू काळभोर यांनी मदत केली.