ग्रेट पुस्तक : कोसला भालचंद्र नेमाडे

अस्मिताच्या वाचकांना मनापासून नमस्कार.

पुस्तकं भावविश्‍व आपल्याभोवती नेहमीच एक कोष निर्माण करत असतात. आज असेच कोष असलेले भालचंद्र नेमाडे लिखित कोसला पुस्तकाबद्दल अभिप्राय…

कोसला फक्‍त पुस्तकं नसून विश्‍व आहे जे समजण्यास कठीण वाटत असले तरी भावनांचा कोष निर्माण करते… पांडुरंग सांगवीकर पुस्तकाचा नायक, नेमाडेंनी हा नायक कुठे तरी सर्वांमध्ये पाहिला खरं तर… हा पंचवीस वर्षांचा तरुण आपल्याला आयुष्यातील चढउतार अगदी सहज साध्या भाषेत सांगत आहे, की काही प्रसंगी आपले प्रतिबिंब कुठे तरी झळकल्या वाचून राहत नाही. पांडुरंग हे सांगतानाही अगदी बिनधास्त आहे, की आई आणि आज्जीचे होणारे भांडण आणि कुठे तरी स्वार्थ साधणारे वडील… मोठ्ठा वाडा अन्‌ त्यात धुडगूस घालणारे उंदीर, त्यांना पकडण्यासाठी केलेला आटापिटा… त्यावेळी मिश्‍किल झालेली लेखणी नकळत हसायला लावते… विनोद ही अगदी जिथल्या तिथे सोडून लेखन पुढचा सरळ मार्ग धरते हे या पुस्तकाचे मोठे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.

पांडुरंगच्या जीवनातील महाविद्यालयीन दिवस आणि त्यासाठी धरलेला शहराचा रस्ता… मित्र कशाप्रकारे भेटले याचे वर्णन अगदी दोन शब्दांत करणाऱ्या लेखकाच्या लेखणीचे कौतुक करावे तितके थोडे. कोसलावर लिहण्यासारखे बरेच काही असतानासुद्धा कोसलाचे वर्णन काही शब्दांत करणे जड जाते. पांडुरंगाचे भावविश्‍व कोसळून पडते ते मनूच्या मृत्यूने… त्यातून सावरणे कठीण वाटत असले तरी त्यातून ते कशाप्रकारे सावरतात हे तुम्ही पुस्तकात वाचू शकतात. हा संपूर्ण प्रसंग फार भावपूर्ण लिहलेला आहे. पांडुरंग खरं तर धाडसी, चंचल किंवा परिपूर्ण वाटत नसला तरी भावनांनी ओतप्रोत भरलेला दिसतो. पुस्तक वाचण्यास प्रेरित करत राहतो.

पांडुरंग सांगवीकर या कथानायकाच्या जीवनाविषयी वाचताना वाचक अवाक्‌ होतो. कोसलाबद्दल लिहिण्यासारखे खूप काही असूनसुद्धा त्याबरोबरीचे किंवा त्या पुस्तकाचे वर्णन करू शकू या जवळपासचे शब्द आपल्यासारखे लोक नाही जमवू शकत. याची समीक्षा करावी ती फक्‍त पु. ल. सारख्या दिग्गजांनीचं. कोसला भावविश्‍व आहे, कोसला बऱ्या वाईटचे बेधडक लिखाण आहे, कोसला मार्मिक विनोद आहे, कोसला असंख्य मनांवर राज्य करणारा कोष आहे… सुरुवात थोडी समजण्यास कठीण वाटत असली तरी पुस्तकं अर्धे वाचण्याची चूक अजिबात करू नका. नेटाने वाचत रहा आणि अद्‌भुत कलाकृती वाचण्याचा खराखुरा आनंद घ्या. पॉप्युलर प्रकाशनने हे पुस्तकं प्रकाशित केले आहे. “कोसला’ नक्‍की वाचा.

– मनीषा संदीप

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)