ग्रेट पुस्तक : हिज-डे’

“अस्मिता’च्या वाचकांना पुन्हा एकदा नमस्कार.

आजचा पुस्तकाचा विषय वेगळा आहे कदाचित या विषयाला, या जगण्याला, त्यांच्या असण्याला काडीचीही किंमत समाज देत नसेल; पण ते आहेत, स्त्री, पुरुष या जातीत मोडत नसले तरी माणूस आहेत. त्यांना हक्क आहे जगण्याचा, मानसम्मान मिळवण्याचा. आजचा अभिप्राय “हिज डे’ या पुस्तकासाठी. स्वाती चांदोरकर या लेखिकेने तृतियपंथी लोकांची व्यथा आपल्यासमोर या पुस्तकातून मांडली आहे.

फार पूर्वी शहेनशाह या लोकांना त्यांच्या प्रामाणिकपणामुळे जनानखान्यात सुरक्षारक्षक म्हणून ठेवत असत. पण पुढे त्यांचा प्रामाणिकपणा इंग्रजांसाठी धोकादायक ठरू शकतो, या हेतूने त्यांना विनाकारण बंदी बनवण्यात आले आणि त्यांचा अतोनात छळ करण्यात आला. पण एक दिवस एका जेलरला त्यांची चुक नाही हे लक्षात येते अन दया दाखवून त्यांना तो एक दिवस मुक्त जगण्यासाठी सोडतो आणि म्हणतो “वन डे इज ऑन्ली हिज डे’ आणि त्यांना त्यादिवशी पासून हिजडे म्हटले गेले हा शब्द त्यांच्यासाठी मुक्तीचा दिवस म्हणून मानाचा आहे, असे ते मानतात.

कथेची सुरवात होते, ती हेलीना नावाच्या 20 वर्षीय लाजऱ्या-बुजऱ्या अन्‌ शारीरिक वाढ पूर्ण न झाल्यामुळे खचलेल्या, जगापासून अलिप्त राहणाऱ्या मुलीपासून. मानसोपचार तज्ज्ञ म्हणून शिक्षण घेत असताना तिची मैत्री होते ती चमेलीबरोबर, जी एका तृतियपंथी हालाची मुलगी असते जिला लोकांनी जवळपास वाळीत टाकल्यासारखेच असते.दुसरी मैत्रिण जया! तिला मुलींबद्दलंच आकर्षण का वाटतं असते, याची नुकतीच जाणीव झालेली. चमेली अन जयाबरोबर मैत्री झाल्यानंतर तिचे आयुष्य पूर्णतः बदलून जाते.. चमेलीसोबत राहून तिला तृतियपंथी लोकांना साधे पोट भरण्यासाठी किती कठीण आयुष्य जगावे लागते याचे प्रचिती येते. शामची श्‍यामली होताना, आणि सुक्कीची “तो’ होताना जी शरीराची, मनाची वेदनादायी चिरफाड होते ते वाचून तर अंगावर काटा उभा राहतो.

शरीर अन्‌ मन दोन्ही भिन्न असणारी हे लोक निसर्गाची ही दुष्ट देणगी नाकारतात, तेंव्हा देवाची माफीही मागतात. प्रामाणिकपणा यांच्यात जन्मतः असतो. अस्वछता, पैशासाठीची धडपड, करावी लागणारी देहविक्री आणि त्यातून जीव घेणारे भयंकर आजार, स्वत:च्या घरच्या लोकांनी नाकारलेले, समाजाने नाकारलेले अशात हेच एकमेकांचा आधार बनतात. अतिशय हृदयद्रावक व्यथा या पुस्तकातून समोर आणणाऱ्या धाडसी लेखिकेला सलाम, त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींचा तपशील अगदी बेडरपणे पुस्तकात मांडला आहे. हेलीना, चमेली, जयाचा आणि तृतियपंथी लोकांचा जीवन प्रवास यातून कसा होतो जाणून घेण्यासाठी हे पुस्तकं नक्की वाचा.

– मनिषा संदीप

Leave A Reply

Your email address will not be published.