ग्रेट पुस्तक : भोगले जे दु:ख त्याला

अस्मिताच्या वाचकांना माझा मनापासून नमस्कार…

“आई” हा शब्दच किती थोर. या शब्दाची महती सांगताना कवी म्हणतात, “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी!’ आई म्हणजे प्रेम, आई म्हणजे विश्‍वास, जगण्याची आशा, आई प्रथम गुरू, आई सर्वस्व लेकराचे. आईला पर्यायी रूप नाहीच, पण जर एखादी स्त्री “आई’ या नावाला कलंक लावणारी असेन, तर तिच्या लेकरांइतके दुर्दैवी कोण असेन? ती स्त्री या व्याख्येत बसते का? असे अनेक प्रश्‍न हे पुस्तकं वाचताना पडतात. तर आज मी अशाच एका पुस्तकाचा परिचय देणार आहे, जिथे आई या नावाला गालबोट लावणारी स्त्री आहे. आई या प्रेमळ नावालासुद्धा मुकलेल्या लेखिकेची व्यथा आहे.

“भोगले जे दुःख त्याला…’ या पुस्तकाचा मी थोडक्‍यात परिचय करून देणार आहे. आशा आपराद या पुस्तकाच्या लेखिका आहेत. मुस्लीम कुटुंबात जन्मलेल्या आशा यांच्या वाट्याला आईचे प्रेम कधीच आले नाही. खरं तर सख्खी आई अशी कशी वागू शकते? हे न उलगडणारे कोडेच आहे. आशा या साधारण रंगरूप असलेल्या. अंगात ताकद नसलेल्या, त्यांचा स्वभाव भित्रा. या रूपगुणांमुळे आईला त्या नकोशा वाटत. मग त्यातून त्यांचा अतोनात छळ केला जात असे. वडील अतिशय प्रेमळ, समंजस, टापटीप राहणीमान, स्वच्छता याकडे कल असलेले, उच्चशिक्षित, त्याकाळी इंग्रज सरकारचे नोकर, त्यातून पैसा मिळत होता, पण जेव्हा इंग्रज भारतातून निघून गेले, तेव्हा त्यांची नोकरीही गेली. त्यांच्या शिक्षणाला साजेशी नोकरी मिळत नव्हती.

नंतर त्यांनी छोटा व्यवसाय सुरू केला; तो सुद्धा अयशस्वी झाला. त्यातून त्यांना नैराश्‍य आले. दारिद्य्र वाढत गेले. घरात आशाची आई अत्यंत रागीट. कोणत्याही गोष्टीतून छळ अन्‌ शिव्या याशिवाय दुसरे काहीच करत नसे. आशा पाठोपाठ मुली झाल्यामुळे तिचा राग जास्तच वाढत गेला. आशा यांचे वडील त्या आठवीत असताना हृदयविकाराने गेले अन्‌ आशाच्या जीवनाची सगळी सूत्रं आईच्या हाती आली. वडील जाताच तिचे लग्न लावले गेले. नवरा ट्रकचालक, वय लहान, आईचा धाक, नवरा त्रास देणारा, यामुळे तिचा स्वभाव अधिकाधिक भित्रा बनत गेला. त्यातून लहान वयात मिळालेले मातृत्व.

खूप हालअपेष्टा, अपमान सहन करत जीवनाचा प्रवास सुरू झाला, पण लेखिकेचा हा प्रवास दुःखद असला तरी त्यातून मार्ग काढताना, स्वतःला घडवताना लेखिका धडाडीची स्त्री वाटते. कथेमधले छोटे छोटे प्रसंगसुद्धा वाचकाला रडवून जातात. आशा यांच्या अस्तित्वाला सुरुवातीपासून नकारात्मक झालर लावली गेली. अपशकुनी म्हणून हिणवले गेले. अनेक गोष्टींना त्यांना जबाबदार धरून अतोनात छळ केला गेला. पण यातूनही त्या जिद्दीने उभ्या राहिल्या. अर्धे राहिलेले शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या मेहनतीला सलाम.

मुस्लीम असूनही हिंदूंबद्दल नितांत आदर असलेली ही लेखिका कायम जातिभेदापासून दूर राहिली. चांगल्यास चांगले, वाईटास वाईट हे परखड लेखन आपल्याला प्रेरणादायी ठरते. अतिशय छान पुस्तकं आहे. मेहता पब्लिशिंग हाऊस यांचे प्रकाशन आहे. एकदा तरी नक्‍की वाचा.

– मनीषा संदीप

Leave A Reply

Your email address will not be published.