ग्रेट पुस्तक : अश्‍वत्थामा

बलिर्व्यासो हनुमांश्‍च बिभीषण !
कृप:परशुरामश्‍च सप्तते चिरंजीवीन: !

महाभारत हा अलौकीक प्रतिभा असलेला ग्रंथ म्हणजेच महाकवी महर्षी व्यास यांचे महाकाव्यच आहे. भारतीयांचे श्रद्धास्थान… आज या महाभारताला घडून जवळपास अडीच-तीन हजार वर्षे झाली आहेत. याच महाभारतात कौरव पांडवांचे घनघोर युद्ध कुरुक्षेत्रात घडले. अन्‌ आपल्याच लोकांनी आपल्याच आप्त स्वजनांचा पराभव करून धर्माचे राज्य स्थापन केले. यात कौरवांचा पराभव झाला. मोजकेच लोक यातून वाचले. त्यात एक नाव अश्‍वत्थामा; जो चिरंजीव तर झाला पण अनेक यातना घेऊन तो आजही जगतो आहे. आजचे पुस्तक शंकर टिळवे लिखित “चिरंजीव अश्‍वत्थामा.’

आचार्य द्रोण अन्‌ माता कृपी यांचा एकुलता एक लाडका पुत्र. मातापित्याचे प्रेमळ छत्र, कौरव पांडवांचा प्रिय सखा, तसेच सर्व नगरवासियांचा आदरस्थान असलेला अश्‍वत्थामा बुद्धिमान, अस्त्र-शस्त्र विद्येत निपूण होता. तत्वज्ञानी होता. त्याच्या असण्याने नेहमी प्रसन्न वातावरण राहात असे. हस्तिनापुरात प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा असा होता. कौरव-पांडव युद्ध होऊन प्रचंड नरसंहार होऊ नये, अशी त्याची इच्छा होती, पण चंचल मन अन्‌ जगण्याचा प्रचंड हव्यास, सोडला तर तो एक आदर्श व्यक्ती होता. कौरव-पांडवांच्या युद्धात आचार्य द्रोण मारले गेले अन आश्‍वत्थामा सुडाने पेटून उठला.

अविचाराने त्याने रात्री पांडव शिबिरात शिरून पाच पांडवांच्या पुत्रांचा नरसंहार केला. शेवटी उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडून भ्रूणहत्येचे पातक घेतले. संतप्त झालेल्या श्रीकृष्णांनी त्याच्या मस्तकावरील जन्मखूण असलेला तेजस्वी मणी काढून घेण्याची आज्ञा केली. त्यातून मोठी जखम होऊन भळभळ रक्त वाहू लागले. त्याला आजन्म असंख्य जखमा, असह्य वेदना, असह्य दुर्गंधी जीवन, अपार दुःखभार वाहात भटकंतीचे जीवन जगण्याचा शाप दिला. अन्‌ तेव्हापासून तो आजपर्यंत हे जीवन जगतो आहे. एका आदर्श व्यक्तीची अशी शोकांतिका का व्हावी? शेवट नसलेला शेवट का व्हावा? सर्वांचा प्रिय, अधर्मी का झाला? हे जाणून घेण्यासाठी पुस्तक नक्की वाचा.

– मनीषा संदीप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)