ग्रेट पुस्तक : …आणि त्या दिवशी माझा मृत्यू झाला

ज्यांना सतत मरणाच्या भीतीने ग्रासले आहे, ज्यांना कॅन्सरसारखे आजार भयंकर वाटतात किंव्हा ते होण्याची सतत भीती वाटते. जे स्वतःच्या जगण्यावर नाराज आहेत, ज्यांना सुंदर आयुष्य जगायचे आहे अशा सर्वांनी हे विलक्षण अद्‌भुत पुस्तकं आवर्जून वाचावे ही माझी कळकळीची विनंती आहे. मी अनेक पुस्तकं वाचली पण विज्ञानाबाहेरचा असा चमत्कार डोळे विस्फारून प्रथमच वाचत होते अनुभवत होते. मला जे अत्यंत आश्‍चर्य वाटत आहे, ते मोठमोठ्या डॉक्‍टरांना अन्‌ जगालासुद्धा वाटले आहे. हा चमत्कार आहे की जादू, की या दुनियेपलीकडचे काही. असो फार वेळ न दवडता या अद्धभुत पुस्तकाची ओळख करून देते. या पुस्तकाचे नाव आहे “आणि त्या दिवशी माझा मृत्यू झाला.’

अनिता मुरजानी यांचा कॅन्सरपासून मृत्यूपर्यंत अन्‌ मृत्यूपासून पुनर्जन्मापर्यंतचा प्रवास आश्‍चर्यकारक आहे. अनिता मुरजानी या मुळ भारतीय; पण वडिलांच्या नोकरीनिमित्त अनेक देशात वास्तव्य करत होत्या. हॉंगकॉंगला अखेर त्यांचे कुटुंब स्थायिक झाले. लहानपणीपासून हिंदू धर्म अन संस्कृती घरात काटेकोरपणे पाळत असत. एक लहान भाऊ, आई-वडील, असे सुखी कुटुंब. आधुनिक जीवन जगत असतानाही पाप-पुण्य यावर विश्‍वास असणाऱ्या अश्‍या त्या होत्या. तरुण वयात डॅनी नावाच्या सुंदर व्यक्तिमत्वाच्या अन अतिशय प्रेमळ उद्योगपतीच्या प्रेमात पडल्या अन्‌ काही दिवसात लग्न बंधनात अडकणार असतानाच वडिलांचा मृत्यू होतो. त्यातून सावरल्यावर त्यांचे लग्न होते अन्‌ सुखी संसार सुरु होतो.

लग्नाला जेमतेम सहा वर्ष होतात अन्‌ एक दिवस तिला कॉलरबोनच्या थोडे वर डाव्या बाजूला घट्ट सूज जाणवते. तिच्या डॉक्‍टरच्या मते ही धोक्‍याची घण्टा होती. त्याच वर्षी त्याची बायोस्पी झाली अन्‌ तिला हॉजकिन्स लिफ़्लोमा झाला असल्याचे डॉक्‍टरांनी निदान केले. तिला स्टेज 2 कॅन्सर होता. मध्यम स्वरूपाचा कॅन्सर. कॅन्सरवर केमोथेरीपी उपचार घेण्यास अनिता तयार नव्हती. यापूर्वी तिने तिच्या जवळच्या मैत्रीणीला अन्‌ नवऱ्याच्या मेहुण्याला काही दिवसांपूर्वी हे वेदनादायी उपचार करूनसुद्धा मृत्यूला जवळ करताना पाहिले होते. तिने पर्यायी पद्धतीने उपचार घेण्यास सुरवात केली.

पण तिचा आजार वाढतच चालला होता. तिची प्रकृती ढासळायला लागली तिच्या शरीरातील लिम्फनोडसमधे कॅन्सर घुसला अन्‌ पाहता पाहता त्याने अक्राळविक्राळ रूप धारण केले. बी सिम्टम्स दिसू लागली. त्यामध्ये रात्री दरदरून घाम येणे, सतत ताप येणे त्वचेला खाज सुटणं अश्‍या अनेक गोष्टींचा समावेश असतो. या साऱ्या गोष्टीवरून आजार वाढला आहे जाणवत होते. थकवा जाणवत होता. एका सकाळी ती बिछान्यातून उठू शकली नाही तिचे संपूर्ण शरीर फुग्यासारखे सुजले होते. तिचे डोळे पूर्णतः बंद झाले होते. छातीत पाणी भरल्यामुळे ऑक्‍सिजन टॅंक असूनसुद्धा श्‍वास घेता येईना.

तातडीने तिला हॉस्पिटलला नेण्यात आले. डॉक्‍टरने उपचार चालू केले पण तिचे शरीर प्रतिसादापलीकडे गेल्याचे सांगून ती काही तासांची सोबती असल्याचे सांगितले. तिचे सर्व अवयव निकामी झाले होते. ती कोणत्याही उपायाने वाचू शकत नव्हती तरी तिच्या पतीच्या इच्छेखातर उपचार म्हणून केमोचा उपचार जो त्या अवस्थेत ती सहन करू शकत नाही हे जाणून ही ते चालू करतात पण त्याच वेळी ती एका वेगळ्या दुनियेत प्रवेश करते. यालाच ती मृत्यूसमीपचे अनुभव म्हणते, जिथे ती स्वतःला पूर्णतः वेदनारहित पाहते. तिथे तिला तिचे वडील अन्‌ तिची जिवलग मैत्रीण भेटते. (हे अनुभव तुम्ही पुस्तकात वाचावेत ते विलक्षण अनुभव मी पूर्णतः सांगू शकणार नाही)

त्या अवस्थेमधून बाहेर आल्यानंतर तिच्या तब्येतीमधे अचानक बदल होऊ लागले. तिच्या प्रकृतीमधे सुधारणा होऊ लागली, तिने तिच्यावर उपचार करणाऱ्या यापूर्वी न पाहिलेल्या डॉक्‍टरला नर्सला नावासहित ओळखले, तिच्यासाठी भारतातून निघालेल्या भावाचा प्रवास ही तंतोतंत सांगितला. ती काही दिवसात उठून बसू लागली, तिच्या जखमा आश्‍चर्यकारकरित्या बऱ्या झाल्या होत्या. तिच्या शरीराची तपासणी करण्यात आली तेंव्हा तिच्या शरीरात कॅन्सरचे नामोनिशाण नव्हते. डॉक्‍टर्सना हे विश्‍वास ठेवणे अवघड जाऊ लागले. त्यांनी पुन्हा पुन्हा तिच्या अनेक तपासण्या केल्या तरी रिपोर्ट नॉर्मलच येत राहिला. त्यांनी तपासणी केलेले काही दिवसांपूर्वीचे तिचे रिपोर्ट अन्‌ आताचे तिचे रिपोर्ट दोन्ही अगदी भिन्न होते.

तिचा शेवटच्या स्टेजचा कॅन्सर पूर्णतः काही दिवसात आश्‍चर्यकारकरित्या बरा झाला आहे, हे त्याना मान्य करावेच लागते. शेवटी हे काही तरी वेगळे आहे जे विज्ञानाच्या पलीकडे आहे याचा स्वीकार करून तिला पूर्ण बरी झाल्याचे सांगून घरी सोडण्यात आले. कोणताही आजार किती क्षुुल्लक आहे अन्‌ त्यातून कसे बाहेर पडता येईन, सुंदर आयुष्य कसे जगता येईन याची प्रेरणा हे पुस्तकं देते. वॉव पब्लिशिंगचे प्रकाशन आहे. नक्की वाचा.

– मनीषा संदीप

Leave A Reply

Your email address will not be published.