चांगले नव्हे महान गोलंदाज हवेत

इंदूर: कसोटी क्रिकेटमध्ये सध्या चांगले गोलंदाज आहेत मात्र महान गोलंदाजांची आज खरी गरज आहे, अशी खंत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केली असून कसोटी क्रिकेटला गतवैभव मिळवून द्यायचे असेल तर प्रामाणिक प्रयत्नांची आवश्‍यकता असल्याचेही त्याने सांगितले.

कसोटी सामन्यांची लोकप्रियता दोन दशकांपूर्वी खूप होती. अनेक संघांतील महान फलंदाज आणि गोलंदाजांची चुरस पाहायला मिळत होती. सध्या हे चित्र दिसत नाही. कसोटी क्रिकेटमध्ये सध्या पुर्वीप्रमाणे गोलंदाज नाहीत आणि त्यांचीच उणीव जाणवते, असेही सचिने सूचित केले.

70 – 80 च्या दशकात लिटील मास्टर सुनील गावसकर व अँडी रॉबर्टस, डेनिस लिली आणि इम्रान खान यांची खुन्नस पाहण्यासाठी चाहते आतूर असायचे. माझी फलंदाजी व वासीम आक्रम किंवा ग्लेन मॅकग्राची गोलंदाजी पाहण्यासाठीही मैदान भरून जात होते. आता तसे चित्र बघायला मिळत नाही. कसोटी क्रिकेटचा दर्जा खालावला आहे.

कसोटी क्रिकेटच्या भविष्यासाठी ही फार चांगली गोष्ट नाही. हाच दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत अजूनही वेळ गेलेली नाही. मात्र त्यासाठी कसोटी सामन्यांसाठी खेळपट्ट्या तयार करताना फलंदाज व गोलंदाज या दोघांनाही लाभ होईल असा दृष्टिकोन पाहिजे. तसेच गोलंदाजांचा दर्जाही सुधारण्याची आज खरी आवश्‍यकता असल्याचेही सचिनने व्यक्त केले.

चांगल्या खेळपट्ट्या तयार केल्यास वेगवान गोलंदाज आणि फिरकी गोलंदाजांनाही त्याचा फायदाच होईल, असेही सचिनने सांगितले. चांगल्या खेळपट्ट्या दिल्या तरच कसोटी क्रिकेट कंटाळवाणे होणार नाही. सामन्यात रंगत निर्माण होईल, असेंही सचिनने स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.