नवी दिल्ली – ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यापासूनच एकापाठोपाठ एक बदल करण्यास सुरुवात केली आहे. एलॉन मस्क यांनी काही दिवसांतच ट्विटरवर व्हेरिफाइड असणाऱ्या अकाउंट्सबाबत एक महत्त्वाची घोषणा केली. ट्विटरवर ब्ल्यू टिक असेल तर ते अकाउंट वापरण्यासाठी तुम्हाला प्रतिमाह काही पैसे ट्विटरला द्यावे लागणार आहेत. या सोबतच, आता वेगवेगळ्या अकाउंटसाठी ब्लू, गोल्डन, ग्रे रंगाची व्हेरिफाइड टिक पाहायला मिळणार आहे.
सध्या ट्विटर कडून हे बदल सुरु असून, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या देखील अधिकृत ट्विटर अकाऊंटची ब्लू टिक काढण्यात आली आहे. आता त्यांच्या अकाउंटसमोर आता ‘ग्रे टिक’ दिसत आहे. दरम्यान, हे ग्रे टिकचे नियम पूर्णपणे लागू करण्यात आलेले नाहीत.
अनेक राजकीय नेत्यांच्या हँडेलसमोर अद्याप ब्लू टिकच दिसत असून, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अकाउंटवर सुद्धा ब्लू टिक आहे. ट्विटरने व्हेरिफाय पॉलिसीत बदल केला असून, या अंतर्गत अनेक राजकीय नेत्यांच्या ट्विटर प्रोफाइलवर ग्रे टिक दिसत आहे.