पैशांसाठी नातवाने केला आजीचा खून

पुणे – कल्याणीनगर परिसरात झालेल्या ज्येष्ठ महिलेच्या खुनाचा उलगडा करण्यात येरवडा पोलिसांना यश आले आहे. पैशांच्या वादातून बावीस वर्षीय नातवानेच आजीचा उशीने तोंड दाबून खून केल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. संबंधित नातवास हिमाचल पोलिसांनी तेथे एका चोरीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. व्यसनासाठी पैसे हवे असल्याने त्याने हे कृत्य केले. पुणे पोलीस त्याला हिमाचल पोलिसांच्या ताब्यातून घेणार आहेत.

ज्येष्ठ महिला राहत असलेल्या सदनिकेतून दुर्घंधी येऊ लागल्यानंतर हा प्रकार समोर आला होता. ज्या ठिकाणी हा खून झाला तेथील सीसीटीव्ही व येणाऱ्या जाणाऱ्यांची नोंद असलेल्या रजिस्टरवरून पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला.

ओशम संजय गौतम (वय 22, रा. हिमाचल प्रदेश) असे खून करणाऱ्या नातवाचे नाव आहे. आजीचा खून केल्यानंतर तो हिमाचल प्रदेशला गेला होता. मात्र, त्या ठिकाणी एका चोरीच्या गुन्ह्यात तेथील पोलिसांनी त्याला अटक केली. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आरोपीला येरवडा पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे. चांदणी चौहान (वय 67, रा. सनशाइन सोसायटी, कल्याणीनगर) असे खून झालेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मनीष आनंद पिंपुटकर (वय 43, रा. शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ओशम हा ज्येष्ठ महिलेचा नातू आहे. तो लहान असतानाच त्याच्या आईचा एका विमान दुर्घटनेत अपघाती मृत्यू झाला होता. त्याला अनेक प्रकारची व्यसने होती. तसेच, आईच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या पैशांवरून त्यांच्यात वाद देखील होते. त्यामुळे चांदणी यांनी त्यांच्या मुंबईत राहणाऱ्या भावाकडे ओशमची तक्रार केली होती. दरम्यान, ओशम हिमाचल प्रदेशात मित्रासोबत राहत असताना त्याने मित्राची दुचाकी व एटीएम कार्डची चोरी केली. त्यानंतर त्याने एटीएममधून दीड लाख रुपये काढले. यानंतर काही दिवसांनी तो पुण्यात आजीकडे आला होता. येथे त्याची आजीबरोबर पैशांवरून भांडणे झाली. त्यामुळे रागातून ओशमने उशीने आजीचे तोंड दाबून खून केला. त्यानंतर घरातील पैसे व दागिने चोरी करून तो परत हिमाचलला गेला. खून झालेली महिला 2 वर्षांपूर्वी पुण्यात राहण्यास आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.