वडगाव मावळ – आंदर मावळातील लालवाडी (डाहुली) येथे आजी व देशाचा राष्ट्रीय पक्षी असलेला मोर यांच्या मैत्रीची चर्चा रंगत आहेत. त्या वन्यजीवांना मदत करतात. पर्यटनासाठी आलेले पर्यटक आजी व मोराच्या मैत्रीचा फोटो काढण्याचा मोह त्यांना आवरत नाही.
दोन वर्षांपूर्वी सुगंधा चिंधु पिंगळे या साठ वर्षांच्या आजीबाईंना करवंदाच्या जाळीत अडकल्याने एक मोराचे पिल्लू जखमी अवस्थेत मिळाले. त्याच्या उजव्या पंखाला व पायाला गंभीर जखम झाली होती. त्याला घरगुती औषध करून त्याला खुराड्यातील कोंबड्यांसोबत वाढविले. जखम नीट झाल्यावर त्याला अनेक वेळा वनपरिक्षेत्राच्या हद्दीत सोडून दिले. पण तो वनक्षेत्रातून आजीला भेटायला येतोच आजी त्याला खायला देतात. तो वनक्षेत्राच्या हद्दीत फिरुन पुन्हा घराच्या परिसरातील आंब्याच्या झाडावर बसतो.
घराच्या परिसरात अजगर व साप दिसताच ओरडून त्यांना माघारी पाठवतो. आंदर मावळात पर्यटन करण्यासाठी आलेल्या पर्यटकांना आजी व मोराच्या अनोख्या मैत्रीचे छायाचित्र काढण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. हा मोर अनोळखी व्यक्ती आल्यावर ओरडतो. घरातील लहान-थोरांसोबत प्रेमाने वागतो.
या वेळी आजी सुगंधा पिंगळे म्हणाल्या की, लालवाडी हद्दीलगत वनक्षेत्र असून, अनेक वन्यजीव उन्हाळ्यात अन्न व पाण्याच्या शोधत येतात. त्यांना पिण्यासाठी पाणी ठेवते. वन्यजीवांने संरक्षण व संवर्धन करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.