आजींनी भरविले चित्र प्रदर्शन; 73 व्या वर्षीही उत्साह कायम

पिंपरी – एखादी आवड आणि शिकण्याची जिद्द असली की त्याला वयही आडवं येत नाही. वयाची सगळी बंधन झुगारून व्यक्ती एका नव्या ऊर्मीने आणि उत्साहाने काम करीत राहते. वाकड येथील 73 वर्षीय लक्ष्मी कुलकर्णी यांनी “शिकण्यासाठी वयाचे बंधन नसते’, हे वाक्‍य शब्दश: खरे केले आहे. म्हातारपण आल्यानंतरही त्यांनी निवांत न बसता पेंटींगचा क्‍लास लावला. त्यामध्ये प्राविण्य मिळविल्यानंतर “कलाकारी’ या नावाने आपल्या चित्रांचे प्रदर्शन चिंचवडमध्ये भरविले आहे.

पी. एन. गाडगीळ कलादालनात त्यांचे हे प्रदर्शन बुधवारपासून (दि. 4) सुरू झाले. पुढील मंगळवारपर्यंत (दि. 10) हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. नगरसेवक निलेश बारणे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्‌घाटन करण्यात आले. लक्ष्मी कुलकर्णी यांचे वय पाहता या वयातही त्यांचा उत्साह दांडगा आहे. तरुणींनाही लाजवतील एवढ्या उत्साहाने त्या काम करताना दिसतात.

ठाणे जिल्हा परिषदेत लिपिक पदावर 22 वर्ष सेवा केल्यानंतर त्या वाकड येथील शिव कॉलनीत राहण्यास आल्या. स्वस्थ बसवेना म्हणून त्या पोहायला शिकल्या. पुढे शिवण क्‍लास, फॅशन डिझाईनिंग, ब्युटी पार्लर, कॉम्प्युटर क्‍लास, ग्लास पेंटींग, बुके बनविणे, शास्त्रीय गायन आणि शेवटी वयाच्या 73 व्या वर्षी त्या पेंटींग शिकू लागल्या आहेत. त्यांनी काढलेली चित्रे व पेंटींग ही जी.डी.आर्ट झालेल्या चित्रकारालाही अचंबित करतील, इतकी सुरेख आहेत. त्यांनी उत्तम निसर्गचित्रे चितारली आहेत. टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तु बनविणे ही त्यांची विशेष आवड. खजूराची फोलकटे, शेंगांची टरफले, फुटलेल्या काचा यापासून त्यांनी बनविलेल्या कलात्मक वस्तू देखील या प्रदर्शनात मांडल्या आहेत. दोन्ही डोळ्यांचे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया होऊनही पेपर वाचणे, व्हॉटसअप पाहणे यामध्ये त्यांना विशेष आवड व रूची आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.