कोल्हापूर – धावत्या दुचाकीवर झाड कोसळून आजी नातवाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना गडहिंग्लज-आजरा मार्गावरील निसर्ग हॉटेलजवळ घडली. सतीश जोतीबा शिंदे (अत्याळ,गडहिंग्लज) व आज्जी सोनाबाई पांडूरंग जाधव अशी मृतांची नावे आहेत.
सतीश एका खासगी शोरुममध्ये कामाला आहे. तो गुरुवारी सायंकाळी आपल्या आजोळी लिंगनूर येथून आजी सोनाबाई यांना घेऊन अत्याळला गेला होता. आज सकाळी कामावर येत असताना आजीला लिंगनूरला सोडण्यासाठी सोबत घेऊन येत होता. ते दोघे गडहिंग्लज-आजरा मार्गावरील निसर्ग हॉटेलजवळ आले असता त्यांच्या दुचाकीवर अचानक झाड कोसळले.
या अपघातात सतीशच्या डोक्याला मार लागल्याने सतीशचा जागीच मृत्यू झाला. परिसरातील नागरीकांनी जखमी सोनाबाई यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू पावलेला सतीश अविवाहित होता. त्याच्या पश्चात कुटुंबीयांमध्ये फक्त आई आहे. सतीशच्या वडीलांचे सहा महिन्यापूर्वीच निधन झाले आहे. तर सतीशची आज्जी सोनाबाई यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सूना, नातवंडे असा परिवार आहे. या घटनेची नोंद गडहिंग्लज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.