नंबर प्लेटवर दिसणारे “दादा’, भाऊ’ नाना’ होणार हद्दपार

वाहनाच्या किमतीतच नंबर प्लेटचा खर्च समाविष्ट ः 1 एप्रिलनंतर उत्पादित वाहनांसाठी हा नियम राहणार

हायसिक्‍युरिटी नंबर प्लेटचा फायदा काय?
हायसिक्‍युरिटी नंबर प्लेटमध्ये विशेष चिप असणार आहे. या चिपमध्ये वाहनांच्या संबंधित माहिती दिली जाणार आहे. परिवहन विभागामध्ये वाहनांची नोंदणी केल्यानंतर ती माहितीही त्या चिपमध्ये राहील. या प्लेटचा पूर्ण पॅनल राहणार आहे. प्लेट बदलण्यासाठी पूर्ण पॅनल बदलावा लागणार आहे. त्यामुळे वाहन चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होईल. शिवाय नंबर पडल्याशिवाय नवे वाहन रस्त्यावर आणता येणार नाही. याबरोबर नंबर प्लेटवर दिसणारे दादा’, भाऊ’ नाना हद्दपार होतील.

नगर – शासनाने 1 एप्रिलनंतर उत्पादित वाहनांना आता हायसिक्‍युरिटी नंबर प्लेट लावण्याचा निर्णय लागू केला आहे. वाहन उत्पादकांकडून ही नंबर प्लेट देण्यात येणार आहे. वाहनाच्या किमतीतच त्याचा खर्च समाविष्ट राहणार असून, ग्राहकांना त्यासाठी वाहन वितरकांना वेगळी रक्कम द्यावी लागणार नाही. कंपनीकडून प्लेट येणार असल्याने आता प्लेटवर दादा, भाऊ, नाना हे आता हद्दपार होणार आहे.

आरटीओ कार्यालयाच्या माध्यमातून या नंबर प्लेट लावण्यात येणार होत्या; परंतु हायसिक्‍युरिटी नंबर प्लेट लावण्याचा निर्णय रेंगाळत राहिला. यावर्षी केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने हायसिक्‍युरिटी नंबर प्लेट लावणे बंधनकारक केले; परंतु 1 एप्रिलनंतर उत्पादित वाहनांवर हा नियम राहणार आहे. या नंबर प्लेटसाठी वेगळे कोणतेही शुल्क आकारू नये,असा निर्णयही घेण्यात आला आहे.

हायसिक्‍युरिटी नंबर प्लेट लावण्याची जबाबदारी ही संबंधित वाहन उत्पादक कंपन्यांवर सोपविण्यात आली आहे. 1 एप्रिलनंतर उत्पादित वाहनांची आवक आगामी 15 ते 30 दिवसांत होण्याची शक्‍यता आहे. संबंधित कंपनीकडून या नंबर प्लेटसाठी वेंडर नेमण्यात येणार आहेत. वाहन खरेदीनंतर आरटीओ कारवाई पूर्ण केल्याच्या तीन दिवसांनंतर ही हायसिक्‍युरिटी नंबर प्लेट मिळणार असल्याची माहिती वाहन वितरकांकडून देण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.