नेवासा – इतकी वर्ष झाली तरी मला मुलबाळ होत नाही आता तुमच्याकडे बघतोच असे म्हणून नातवाने चक्क आजोबावरच कोयत्याने सपासप वार करुन आजोबा गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे. जखमी आजोबाला सोडविण्यासाठी आलेल्या चुलता, भाऊ आणि चुलतीवरही हल्ला केला असून त्यात ते देखील जखमी झाले आहे. रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास नारायणवाडी (ता.नेवासा) येथे ही घटना घडली.
याबाबत पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, नारायणवाडी (ता.नेवासा) येथील गोकुळ मधुकर क्षीरसागर हा रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास त्याच्या राहत्या घरासमोर कोयता हातात घेवून घराच्या दरवाज्यासमोर कोयता मारत होता. आजोबा जालिंदर मुकिंदा क्षीरसागर यांनी त्याला दरवाज्यावर कोयता का मारण्याचं कारण विचारलं? त्यावर आरोपी नातू गोकुळ म्हणाला की, मला लग्नाला इतकी वर्षे झाले तरी मुलबाळ होत नाही. आता तुमच्याकडे बघतोच तुम्हाला मारुनच टाकतो असे म्हणून त्याने आजोबांच्या तोंडावर कोयत्याचे वार केले.
अचानक झालेल्या या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. गोकुळला रोखण्यासाठी त्याचे चुलते बाबासाहेब जालिंदर क्षीरसागर, चुलती स्वाती बाबासाहेब क्षीरसागर आणि चुलत भाऊ विश्वास बाबासाहेब क्षिरसागर हे कोयता गेले. मात्र गोकुळने त्यांच्यावर देखील कोयत्याने वार केला. त्यात ते जखमी झाले. जखमींवर नेवासा फाटा येथील श्वास हॉस्पिटमध्ये उपचार सुरू आहे. आरोपी गोकुळ क्षिरसागरला पोलिसांनी अटक केली आहे
तीन दिवसांची पोलीस कोठडी
नेवासा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक तपासी अधिकारी ज्ञानेश्वर थोरात यांनी आरोपी गोकुळ क्षीरसागर याला नेवासा न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.