पुरेसा निधी देणार : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही
जलतरण तलावाचे कामही लवकरच
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आवारात सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी आणि जलतरण तलावासाठी 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यापीठाच्या कार्यक्रमात केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील पै. खाशाबा जाधव क्रीडा संकुलातील पॅव्हेलिअन इमारत, इनडोअर हॉल आणि अद्ययावत सिंथेटिक ट्रॅकच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष राजेश पांडे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, तंत्र शिक्षण संचालक अभय वाघ आणि क्रीडा व शारीरिक शिक्षणाचे संचालक डॉ. दीपक माने उपस्थित होते.
पवार म्हणाले, “बालेवाडीतील क्रीडा सुविधाप्रमाणे विद्यापीठातदेखील अद्ययावत क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य शासनाचे सहकार्य राहील. राज्याच्या हितासाठी आणि शैक्षणिक प्रगतीसाठी शासन भक्कमपणे पाठीशी उभे राहील. डेक्कन कॉलेज आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या स्माकरकासाठी देखील सहकार्य करण्यात येणार आहे. प्रास्ताविकात राजेश पांडे यांनी “क्रीडा संकुलाचा परिपूर्ण वापर करण्यासाठी विद्यापीठ लवकरच धोरण ठरविणार आहे,’ असे सांगितले.
विद्यापीठाला मिळणार 13 कोटींचे अनुदान
पुण्यातील अपूर्ण शिक्षण प्रकल्प पूर्ण करून देशपातळीवर लौकीक वाढविण्याचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्याला सक्षम करणारे शिक्षण विद्यापीठात मिळायला हवे यासाठी विद्यापीठ आणि शासनाला मिळून काम करावे लागेल. राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियानासाठी 13 कोटी 33 लाख रुपये मंजूर करण्यात येत असल्याची माहिती उदय सामंत यांनी यावेळी दिली.
“आम्ही तुम्हाला किती पगार देतो…’
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रीडा संकुलातील पॅव्हिलियन इमारत, अद्यावत सिंथेटिक ट्रॅक व इनडोअर हॉल इमारतीच्या उद्घाटनापूर्वी त्याची बारकाईने पाहणी केली. शुटिंग हॉलच्या सिलिंगच्या उंचीत त्रुटी असल्याचे अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिली. “आम्ही तुम्हाला किती पगार देतो, हे काय काम केले,’ अशी विचारणा केली. त्यावर विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी अंजली भागवत यांनी तशा सूचना केल्याचे सांगितले. अंजली भागवत यांनी तुम्हाला चांगलीच सूचना केली. मात्र, तुम्ही ती उंची चुकीची केली त्याबाबत मी सांगत आहे. काहीही कारणे सांगतात, असे म्हणत अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावले.