Maharashtra Assembly Election 2024 | राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून यंदाच्या निवडणुकीत भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना व अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे महायुती म्हणून एकत्र लढणार आहेत. महायुतीचे जागावाटप आता निश्चित झाले असले तरी आता काही जागांवरून वादाचे वारे वाहू लागले आहे.
पुण्यातील वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवारी मिळाली असून येथून विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. मात्र, याच मतदारसंघात भाजप नेते जगदीश मुळीक यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहचल्याने महायुतीमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आज (मंगळवार) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने मुळीक यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याची बातमी येताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मुळीक हे या मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार असून त्यांची अपक्ष उमेदवारी महायुतीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
यामुळे महायुतीतील अंतर्गत तणाव उफाळून आला असून त्याचे भविष्यातील परिणाम काय असतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. वडगावशेरी मतदारसंघातील या वादामुळे महायुतीच्या इतर जागांवरही अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत देखील असेच खटके उडताना दिसतायेत.
आता पुढे महायुतीतील वरिष्ठ नेते वडगावशेरीबाबत काय भूमिका घेतात व या मतदारसंघातील राजकीय समीकरणं कशी बदलतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.