पाथर्डी – राज्यातील ग्रामसेवकांच्या प्रलंबित मागण्या शासनाने मान्य कराव्यात या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या पाथर्डी तालुका संघटनेच्यावतीने पंचायत समिती कार्यालयाच्या दारात एक दिवसीय धरणे व असहकार आंदोलन करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
राज्यातील 22 हजार ग्रामसेवक संवर्गाच्या प्रलंबित मागण्या अनेक वेळा लेखी निवेदने देऊन सुद्धा मान्य झालेल्या नाहीत. यावेळी ग्रामसेवकांनी अनेक मागण्या मान्य करण्याची मागणी केली. यामध्ये ग्रामविकास अधिकारी पद रद्द करण्यात येऊन फक्त पंचायत विकास अधिकारी पद निर्मिती व्हावी, ग्रामसेवक संवर्ग प्रवास भत्ता शासनाच्या निर्णयाप्रमाणे मंजूर व्हावा, ग्रामसेवक शैक्षणिक पात्रता बदलून पदवीधर ग्रामसेवक निर्मित व्हावेत, सन 2011 चे लोकसंख्येवर आधारित राज्यभर ग्रामविकास अधिकारी सज्जे व पद वाढवावेत, ग्रामसेवक अधिकारी वेतन त्रुटी दूर व्हाव्यात, सन 2005 नंतरचे ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, ग्रामसेवकाकडील अतिरिक्त कामे कमी करावी अशा विविध मागण्या यासाठी आंदोलन करण्यात येत आहे.
शासनाने ग्रामसेवकांच्या आंदोलनाची वेळीच दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनात संघटनेचे तालुकाध्यक्ष दिलीप नागरगोजे, सचिव अशोक रोकडे, एकनाथ आंधळे, अशोक दहिफळे, सुरेंद्र बर्डे, मुरलीधर शिरसाठ, अंबादास नजन ,सुहास शेळके, गिरीश उगार, सचिन हरिश्चंद्र, मच्छिंद्र शिरसागर, महारुद्र बडे यांच्यासह ग्रामसेवकांनी सहभाग घेतला.