शिरूर : सध्या राज्यातच उन्हाचा तडाका वाढला असून वाढत्या उन्हामुळे शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात सुरू कराव्यात व शिक्षकांवर होणाऱ्या गंभीर गुन्ह्यात चौकशी व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन शिरूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी महेश डोके व शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना देण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष माऊली पुंडे, तालुका शिक्षक संघाचे शिक्षक नेते संतोष शेवाळे, सरचिटणीस आपासाहेब रसाळ, सह सरचिटणीस सोमा गायकवाड, विलास जासूद, खंडू निचित, धन्यकुमार धस व शिक्षक बांधव उपस्थित होते .
शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळातील काही शिक्षकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहे. शिक्षक हा समाजापुढे आदर्श असून, या प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करत असताना शिक्षक समन्वय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांस विश्वासात घ्यावे अशी मागणी करून, गुन्हे दाखल झाल्यानंतर कुटुंबाला मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
सध्या उन्हाळा ऋतू सुरू झाला असून, उन्हाची तीव्रता लक्षात घेता दुपारच्या सत्रात शाळा घेतल्यास उन्हाचा त्रास विद्यार्थ्यांना होऊ शकतो. तर उन्हाची तीव्रता 40° पेक्षा पुढे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात शाळा सुरू करावे तशी मागणी ही या निवेदनात करण्यात आली आहे.