शिरूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर शहर आणि तालुक्यातील मतदारांमध्ये मतदार जनजागृती करण्यासाठी तालुका प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले. यामध्ये मतदान जनजागृती रॅली, कार्यशाळा, पथनाट्य आणि विद्यार्थ्यांच्या निबंध व चित्रकला स्पर्धांचा समावेश आहे.
शिरूर विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, स्वीप नोडल अधिकारी तथा मुख्याधिकारी प्रितम पाटील, निवडणूक नायब तहसीलदार सुजाता बाराहाते, शिरूर नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयांचे प्राचार्य, शाळांचे मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, बी. एल. ओ. आदींनी मतदार जनजागृती मोहिमेत सहभाग घेतला.
सी. टी. बोरा कॉलेज, विजय माला जुनियर कॉलेज ऑफ सायन्स, सिताबाई थिटे महाविद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल व विद्याधाम प्रशाला या ठिकाणी मतदान जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण मतदार संघातील विविध ठिकाणी EVM मशीन व VV Pad या बाबत प्रात्याक्षीक करून जनजागृती करण्यात आली.
शिरूर शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या मैदानावर महिलांसाठी विशेष मतदार जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आले. तसेच 198 मतदार संघातील विविध ठिकाणी महिलां मतदार नोंदणी करिता, दिव्यांग मतदार नोंदणी करिता व नव मतदार नोंदणी करिता, अनुसूचित जमाती करिता नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
मतदार जनजागृती कार्यक्रमामध्ये सर्व नागरिकांनी सहभागी होऊन लोकशाही बळकट करण्यासाठी व मतदानाची टक्केवारी वाढवावी, तसेच ज्या नागरिकांचे नाव मतदार यादीत नसेल किंवा दुरुस्ती करावयाची असेल त्यांनी आपले भागातील बी. एल. ओ. यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन 198- शिरूर विधानसभा मतदार संघाचे स्वीप नोडल अधिकारी तथा मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी केले.