ओझर (वार्ताहर) : शिरोली बुद्रुक कृषी सेवा सहकारी संस्थेची ४९ वार्षिक सर्वसाधारण सभा आनंदात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सत्यशील शेरकर सर्व संचालक मंडळ,संस्थेचे अधिकारी व कर्मचारी वर्ग व मोठ्या प्रमाणात सभासद उपस्थित होते. सभेची सुरुवातीस गणेश पूजन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय निवृत्तीशेठ शेरकर तसेच संस्थेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय सोपानशेठ शेरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन सभेस सुरुवात झाली. यावेळी संस्थेच्या कार्यक्षेत्रातील इयत्ता दहावी मध्ये एक ते तीन क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा, विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या तसेच शासकीय नोकरी मिळवणाऱ्या युवक युवतींचा सत्कार करण्यात आला.
संस्थेच्या मुख्य हिशोबनीस सुनिता भालेराव यांनी सभेपुढे येणाऱ्या विषयांचे वाचन केले. त्या सर्व विषयास सर्व सभासदांनी एकमुखाने संमती दिली. संस्थेचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी संस्थेचा प्रगती आलेख सांगतानाच कृषक सेवा सहकारी संस्थेमध्ये आपली संस्था महाराष्ट्रात एक नंबर असल्याचे सांगितले.
शिरोली बुद्रुक कृषी सेवा सहकारी संस्थेचे ‘ब’ वर्ग सभासद धरून ३ हजार ४६० सभासद आहेत. ३ कोटी ५० लाख एवढे संस्थेचे अधिकृत भाग भांडवल आहे.३ कोटी ९ लाख ५१ हजार ६१० एवढे वसूल भाग भांडवल आहे.
३७ कोटी ९० लाख १७ हजार ११६ रुपये ६१ पैसे एवढे संस्थेकडे खेळते भाग भांडवल आहे. संस्थेकडे १४ कोटी ९८ लाख १० हजार ४९४.९१ एवढ्या रुपयाच्या ठेवी आहेत. संस्थेला १ कोटी ६९ लाख ९५ हजार ३२३.९९ रुपयाचा नफा झाला आहे. संस्थेचा एनपीए ८.५८% एवढा असून संस्थेकडे एसएमएस सुविधा अल्प दरात लॉकर आणि कॅशलेस बँकिंग सुविधा उपलब्ध आहे.
चालू वर्षी सभासदांना १२ टक्के लाभांश देण्यात आला.यावेळी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसन देखील करण्यात आले विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे प्रतिनिधी अरुण थोरवे व अँडवोकेट अविनाश थोरवे यांनी सभासदांना मार्गदर्शन केले. उपस्थित सभासदांचे संस्थेचे संचालक संदीप शिंदे यांनी आभार मानले.