पुणे – जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले असून, चौदाशे ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची पुढील पाच वर्षांसाठीची आरक्षण सोडत येत्या 8 डिसेंबर रोजी होणार आहे. तालुकास्तरावर तहसील कार्यालयामार्फत या आरक्षण सोडतीचे नियोजन केले जाणार आहे. त्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मंगळवारी आरक्षण सोडतीची घोषणा केली.
पुणे जिल्ह्यामध्ये 1 हजार 408 ग्रामपंचायती असून त्यातील चौदाशेंच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत काढली जाईल. आठ ग्रामपंचायती नव्याने स्थापन झाल्या आहेत. नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायती संदर्भात शासनाकडून अद्याप आरक्षणाबद्दलचे कोणतेही आदेश नसल्याने या आठ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत काढली जाणार नाही.
आरक्षण सोडतीमध्ये सर्वसाधारण गटासाठी 756 ग्रामपंचायती सरपंचपदे उपलब्ध आहेत. त्यातील 383 सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी, तर 373 सर्वसाधारण गटासाठी आरक्षित होतील. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 347 ग्रामपंचायतींचे सरपंचपद आरक्षित आहेत. त्यातील 177 महिलांसाठी, तर 170 नामाप्रसाठी आरक्षित आहेत.
अनुसूचित जमातीसाठी 58 सरपंचपद आरक्षित आहेत. त्यातील ते 30 महिलांसाठी आरक्षित असतील. अनुसूचित जातीसाठी 125 सरपंच पदांपैकी 66 पदे महिलांसाठी आरक्षित आहे. अनुसूचित क्षेत्रांमधील 114 ग्रामपंचायती असून त्यामधील 58 सरपंच पदेही महिला प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आली आहेत.