वाघोली – वाघोली (तालुका हवेली) येथे सतत भेडसावणारी समस्या म्हणजे वाहतूक कोंडी. या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने सिग्नल व्यवस्था करण्यात आली होती. हि सिग्नल व्यवस्था पूर्ण क्षमतेने नियोजित वेळेत सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत वाघोली प्रयत्न करत असून लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, लोणीकंद वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीच्या वतीने वाहतूक कोंडी मुक्तीसाठी ग्रामपंचायत पुढाकार घेत असल्याची माहिती ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच समीर भाडळे यांनी दिली.
खांदवे नगर, लॉगिन हॉटेल परिसर, वाघेश्वर मंदिर चौक परिसर, आव्हाळवाडी फाटा, केसनंद फाटा चौक, बी जे एस कॉलेज चौक आदी भागात होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठीक ठिकाणी सिग्नल यंत्रणा लवकरच योग्य पद्धतीने कार्यान्वित करण्यात येणार आहे. याकामी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व अन्य कार्यकारी मंडळ यांचे सर्वतोपरी सहकार्य वाहतूक शाखा व पोलिस यंत्रणा यांना राहणार असल्याचे समीर भाडळे यांनी सांगितले.
“वाघोलीमधील बेशिस्त पार्किंग बाबत वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. नो पार्किंग चे बोर्ड वाघोली च्या हद्दीत बसवण्यात येणार आहेत. याशिवाय ग्रामपंचायतीच्या मदतीने नागरिकांच्या चार चाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था देखील करण्यात येणार आहे.” – जयंत पाटील (सहाय्यक पोलीस निरीक्षक, लोणीकंद वाहतूक शाखा, पुणे)