ग्रामपंचायत कर्मचारीही छेडणार आंदोलन

ग्रामसेवक व संगणक परिचालक यांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरूच

वाघळवाडी-राज्यात सध्या ग्रामसेवक व संगणक परिचालक यांच्या बेमुदत कामबंद आंदोलनामुळे ग्रामीण भागातील गाव गाड्याचे कामकाज ठप्प झाले असतानाच आता ग्राम विकासाचा खरा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनीही आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी दि. 16 सप्टेंबर रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्याचा इशारा पुणे व सातारा जिल्हा श्रमिक संघाचे सरचिटणीस कॉ. ज्ञानोबा घोणे यांनी बोलताना दिला आहे. ग्रामीण विकासामध्ये सध्या प्रत्येक गावात ग्रामसेवक संगणक परिचालक व ग्रामपंचायत कर्मचारी हा विकासाचा महत्त्वाचा घटक मानला जातो. यामध्ये प्रामुख्याने ग्रामपंचायत कर्मचारी या घटकाकडे राज्य शासनाने वेळोवेळी दुर्लक्ष केल्याने राज्यातील हजारो ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न अद्याप मार्गी लागले नसल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. दि. 22 ऑगस्टपासून राज्यातील ग्रामसेवकांचे लेखणीबंद तसेच संगणक परिचालक यांचे कामबंद आंदोलन सुरू असल्याने ग्रामीण भागातील विकासाचा गाडा सध्या ठप्प झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

या आंदोलनामुळे ग्रामीण भागात महत्त्वपूर्ण कागदपत्रांची कामे खोळंबली असल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे. मात्र काही प्रमाणात आतापर्यंत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मदतीने अनेक गावातील लहान मोठी कामे होऊन ग्रामस्थांना मदत मिळत होती; परंतु आपल्या प्रलंबित मागण्या व न्याय हक्कांसाठी पुणे व सातारा जिल्हा श्रमिक संघ संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली असून संघटनेचे सरचिटणीस ज्ञानोबा घोणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यात या आंदोलनाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. या आंदोलनात राज्यातील जास्तीत जास्त कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेचे जेष्ठ जिल्हा सल्लागार पापाभाई तांबोळी यांनी केले आहे.

  • या आहेत मागण्या
    राज्यातील कर्मचाऱ्यांना नगरपालिका किंवा नगरपंचायत तसेच चतुर्थ वेतनश्रेणीचा दर्जा मिळावा, कर्मचाऱ्यांना विमा सुरक्षा कवच मिळावे, आकृती बंधात सुधारणा करण्यात यावी, सुधारित वेतन दराची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी तसेच राहणीमान भत्ता व जलसुरक्षाची बिले वेळेत मिळावीत, कर्मचाऱ्यांचे एचडीएफसी बॅंकेच्या खात्यावर वेतन तातडीने जमा करण्यात यावे यासह प्रमुख मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर दि. 16 सप्टेंबर रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष राजेंद्र वाव्हळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×