ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध कराव्यात

उदयनराजे भोसले; हेवेदावे, इर्ष्येला तिलांजली देऊन विकासात्मक भूमिका घ्यावी

सातारा – करोनामुळे बळीराजासह ग्रामीण भागासह सर्वच जनता त्रस्त आहे.आरोग्य कर्मचारी, पोलिस प्रशासन, सर्व सरकारी, निमसरकारी  विभागातील करोना योद्‌ध्यांवर तणाव आहे. अशा परिस्थितीत गावपातळीवर इर्ष्या, चढाओढ, किरकोळ कारणांना तिलांजली देऊन जिल्हयातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध करण्याचे उदिष्ट ठेवावे. जिल्हयातील बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींना राज्यातून आणि विशेषतः केंद्रातून लोकसंख्येनुसार विशेष निधी उपलब्ध करुन विकासात्मक प्रोत्साहन देण्याकरीता कटिबध्द राहू, अशी ग्वाही खासदार उदयनराजे भोसले यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.

ग्रामपंचायती ग्रामविकासाचा पाया तर ग्रामपंचायतीच्या निवडणुका लोकशाहीचा पाया आहे. गावामध्ये आजही निवडणुका सोडून अन्य बाबतीत गटतट बाजूला ठेवून, यात्रा- जत्रा आणि गावाच्या विकासाचे उपक्रम राबविले जातात. ग्रामीण भागात कष्टकरी, शेतकरीवर्गामुळे माणुसकी टिकून आहे. तथापि, निवडणुका आल्या की,इर्ष्या- चढाओढ आणि “मी मोठा का तू’ यामधून घमासान घडते. प्रसंगी आख्खं गांव वेठीस धरले जाते आणि पुढे किमान पाच वर्षे तरी हा राजकीय तणाव विकोपाला जातो. गावच्या विकासाला काही प्रमाणात का होईना खीळ बसतेच. त्याहीपेक्षा गावातील निकोप वातावरण गढूळ होते, याची प्रचिती अनेक ठिकाणी दिसून येते. निवडणुका निकोप स्पर्धात्मक होणे हे अपेक्षित असते.

तथापि, अलिकडच्या काळातील निवडणुका पाहिल्या तर गावांत दोन उभे गट पडलेले दिसून येतात. तसेच करोनाची पार्श्‍वभूमी पाहता, ग्रामीण भागातील जनता लॉकडाऊन, अनलॉक अशा प्रक्रियेमुळे मेटाकुटीला आली आहे. इच्छा असूनही काही प्रमाणात का होईना करोनाच्या काळात जनतेवर बंधने लादली गेल्याने जनता विवंचनेत आहे. अशा परिस्थितीत जिल्हयातील ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुका गावपातळीवरील असल्याने त्याचा धुरळा गावातील प्रत्येक घरटी उडणार आहे.

त्यामुळे करोना संसर्ग वाढण्याची शक्‍यता अधिक आहे. त्याऐवजी हेवेदावेविरहित सर्वांच्या वैचारिक सहकार्यातून बिनविरोध निवडणुका झाल्यास त्याचे चांगले दूरगामी परिणाम दिसतील. गावाच्या एकीव्दारे या निवडणुका देशाला नवी दिशा देणाऱ्या ठरतील. त्यामुळे बिनविरोध निवडणुका हे मर्म प्रत्येक कार्यकर्त्यांने जाणून घेऊन आपल्या गावाचे हित साध्य करावे, असे आवाहन उदयनराजे भोसले यांनी केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.