पुणे पालिकेत येणाऱ्या गावांत ग्रामपंचायत निवडणूक !

पूर्व हवेलीत संभ्रम; शासनाच्या दुहेरी अध्यादेशामुळे हिरमोड

संतोष गव्हाणे

पुणे  – पुणे महापालिकेमध्ये नव्याने 23 गावांचा समावेश करण्याचा अध्यादेश शासनाने जारी केला असून याबाबत नगरविकास विभागाने जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल मागविला आहे. परंतु, ही प्रक्रिया सुरू असतानाच या गावांपैकी काही गावांतीत ग्रामपंचायत निवडणुकाही जाहीर झाल्या आहेत. डिसेंबरपासून याबाबतची प्रक्रियाही सुरू होत आहे. या दोन्हीही शासकीय प्रक्रिया एकाच वेळी सुरू असल्याने गाव पालिकेत जाणार की ग्रामपंचायत निवडणूक होणार, याबाबत या गावांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

 

राज्य शासनाने पुणे महापालिकेच्या हद्दी लगतच्या 34 गावांचा समावेश करण्याचा अद्यादेश 2014 मध्ये जारी केला होता. त्यापैकी सुरवातीलच्या टप्यात 23 गावांचा समावेश 2017 मध्ये करण्यात आला तर आता 11 गावांच्या समावेशाबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. नगरविकास विभागाने नव्याने समाविष्ट करण्यात येणाऱ्या गावांचा तपशील तसेच गावांचा समावेश केल्यानंतर पुणे शहराची होणारी सुधारीत हद्द, सर्व्हे नंबर, जी गावे अंशत: घ्यायची आहेत, त्यांचा क्षेत्रनिहाय तपशील याची माहिती मागविली आहे. यानुसार म्हाळुंगे, सूस, बावधन बु., किरकटवाडी, पिसोळी, कोंढवे-धावडे, न्यू कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बु., नऱ्हे, मंतरवाडी, होळकरवाडी, औतांडे-हांडेवाडी, वडाची वाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभुळवाडी, कोळेवाडी आणि वाघोली या गावांचा पुणे महानगरपालिकेत समावेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

 

दरम्यान, महानगरपालिकेत गाव समावेशाच्या हालचाली सुरू असतानाच एप्रिल ते जुन 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या एकुण 54 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. यामध्ये पालिकेत समावेश करण्यात येणाऱ्या पूर्व हवेलीतील औताडे हांडेवाडी, शेवाळेवाडी, वडाची वाडी, मांजरी खुर्द या गावांचाही समावेश आहे. त्यामुळे या गावात पालिका की ग्रामपंचायत असा संभ्रम निर्माण झाला आहे.

 

ग्रामपंचायत निवणूक जाहीर झाल्यानंतर या गावातील सरपंच तसेच सदस्य पदासाठी इच्छुकांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. याकरीता राजकीय गटही सरसावले आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार मंगळवार (दि.1 डिसेंबर) प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे. मंगळवार (दि.1 ते दि. 7 डिसेंबर) या कालावधीत हरकती व सूचना दाखल करून घेणे. तर, गुुुुरुवारी (दि. 10 डिसेंबर) प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे या गावात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे.

 

यामध्ये पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट होणाऱ्यांत गावांचीही नावे असून त्याबाबत नगरविकास विभागानेही अहवाल मागविला आहे. 2021 या वर्षाच्या सुरवातीसच नव्याने समाविष्ट होणाऱ्या गावात पूर्व हवेलीतील या गावांचाही समावेश असणार आहे. त्यामुळे मोठा खर्च करून ग्रामपंचायत निवडणूक लढविल्यास आणि त्यानंतर गाव पालिकेत गेल्यास सरपंच, सदस्य म्हणून निवडून आलेल्यांचा सर्व खर्च वाया जाणार आहे. याच कारणातून सध्या या गावात पालिका समावेश की ग्रामपंचायत निवडणूक या मुद्यावरून संभ्रम निर्माण झाला आहे.

 

ग्रामपंचायत निवडणूक होणारी पूर्व हवेलीतील अन्य गावे…

लोणी काळभोर, कुंजीरवाडी, तरडे, थेऊर, अष्टापूर, भवरापूर, हिंगणगाव, कोरेगांवमुळ, नायगांव, न्हावी सांडस, पेठ, प्रयागधाम, ऊरूळी कांचन, शिंदवणे, सोरतापवाडी, बकोरी, केसनंद, शिरसवडी, तुळापूर, वढू खुर्द, सांगरूण, डोणजे, घेरासिंहगड, गोऱ्हे बुद्रुक, गोऱ्हे खुर्द, खेडशिवापूर, कोंढणपूर, रहाटवडे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.