सातारा – सरपंच आरक्षण लटकल्याने निवडणुकीत गोंधळाची परिस्थिती

विक्रम कुंभार

हेळगाव -विकासाची गंगा खेडोपाडी पोहोचवण्याचं काम ग्रामपंचायतीमार्फत केलं जातं आणि याच या संस्थेचा गाव कारभारी निवडण्याची वेळ म्हणजे ग्रामपंचायत निवडणूक. कराड तालुक्‍यातील 104 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा बिगुल नुकताच वाजला आहे. दि. 15 जानेवारीला मतदान होत आहे. मात्र, निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या खऱ्या पणं नक्की सरपंच कोण होणार? हे मात्र, निवडणुकीनंतर ठरणार आहे. दरम्यान, गुडघ्याला बाशिंग बांधून बसणाऱ्या उमेदवारांचं आता निवडणूक लढवायची की नाही, अशी द्विधा मनस्थिती होऊन बसली आहे. 

भाजप महायुतीच्या शासनाने थेट जनतेतून सरपंच निवडण्याचा कायदा केला. पणं ठाकरे सरकारने हा निर्णय रद्दबातल ठरविला. निवडणूक जाहीर झाली आणि निवडणूक आयोगाचा हा निर्णय जरा गडबडीत झाला असल्याच्या चर्चेला उधान आले आहे. अजूनही जिल्ह्यातील सरपंच आरक्षण सोडत झालेली नाही. आणि निवडणूक जाहीर झालेल्या सातारा जिल्ह्याच्या बाबतीत विचार करायचा म्हटलंतर 879 ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे. परंतु, सरपंच आरक्षण सोडत झालेली नाही, ही सोडत निकालानंतर होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केल्याने इच्छुकांची कोंडी झाली आहे.

प्रभाग आरक्षणानुसार उमेदवार निवडणे व ते निवडून आणणे तसेच पॅनलला बहुमतपर्यंत पोहोचणे. निवडणुकीनंतर सरपंच पदाचे आरक्षणाचा उमेदवाराला आपल्या पॅनलमध्ये निवडून आला आहे की नाही आणि निवडून आला असेलतर ठीक नाहीतर एवढं करूनही काही उपयोग काय? अशा अनेक बाबींना पॅनल प्रमुखांना सामोरे जावे लागणार आहे. याशिवाय अनेक जण सरपंच पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. पण त्यांनाही निर्णयापर्यंत पोहोचता येत नाही ते म्हणजे निवडणुकीला उभा राहायचं का आणि राहिलो तर निवडून आलो पाहिजे. त्याचबरोबर आरक्षण हे आपल्याप्रमाणे पडलं पाहिजे, अशी अनेक बाबतीत संभ्रमावस्था पॅनेल प्रमुखांसह इच्छुक उमेदवारांची झाली आहे.

सरपंच पद गटाला हवं असेलतर संपूर्ण पॅनल निवडून आले पाहिजे, हे फार महत्त्वाचे होऊन बसले आहे. ठरल्याप्रमाणे निवडणुका होतील निकालही लागतील पण गावकारभारी कोण? हे निकालानंतर आरक्षण जाहीर झाल्यानंतर निश्‍चित होणार असल्याने राजकीय गोंधळाची परिस्थिती तयार झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.