ग्रामपंचायत निवडणूक : मतदान केंद्रांवर प्रशासनाची करडी नजर

हिंजवडी ग्रामपंचायत अतिसंवेदनशील म्हणून घोषित

हिंजवडी – हिंजवडी अतिसंवेदनशील तर माण, मारुंजी, नेरे ही आयटी परिसरातील संवेदनशील मतदान केंद्र असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी व पोलीस प्रशासन या केंद्रांवर करडी नजर ठेवून आहे. त्यामुळे या चारही गावांमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याचे मुळशीचे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभय चव्हाण यांनी सांगितले.

आज शुक्रवारी (दि. 15) होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मुळशी तालुक्‍यात मतदान होणाऱ्या 36 ग्रामपंचायतींपैकी 17 ग्रामपंचायती संवेदनशील तर हिंजवडी ही एकमेव ग्रामपंचायत अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहे.

मतदान केंद्रावर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, बोगस मतदार व तोतयागिरी करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे हिंजवडीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी सांगितले. त्यांनी प्रत्येक गावातील उमेदवार व त्यांच्या प्रतिनधींची बैठक घेऊन आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत.

6 वॉर्डसाठी तीन ठिकाणी होणार मतदान
हिंजवडीतील वॉर्ड क्रमांक 1 व 6 चे मतदान परांजपे बिल्डरच्या ब्लुरिज स्कूल मध्ये होणार असून, वॉर्ड क्रमांक 2 चे मतदान न्यू इंग्लिश स्कूल (माध्यमिक शाळा) हिंजवडी येथे होणार आहे तर उर्वरित वॉर्ड क्रमांक 3, 4 व 5 या तीनही वॉर्डाचे मतदान जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये होणार आहे.

मुळशीत मतदान होणारी संवेदनशील गावे पुढीलप्रमाणे – माण, मारुंजी नेरे, रिहे, खेचरे, चांदे, नांदे, मादेडे, भुकूम, कासार आंबोली, घोटावडे, पौड.

बिनविरोध झालेली संवेदनशील गावे : कोळवन, आंबेगाव, काशीग, लवळे, मुठा

अतिसंवेदनशील गाव – हिंजवडी

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.