ग्रामपंचायतीतील अपहार पडणार महागात

अपहार झाल्यास थेट होणार कारवाई

पुणे – जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये होणाऱ्या अपहारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे शासनाचे नुकसान होत असून, चौकशीही नीट होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. ग्रामपंचायतीतील हे प्रकार थांबविण्यासाठी आता जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास विभागाने कंबर कसली असून अपहार झाल्यास थेट कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याचे परिपत्रक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार काढण्यात आले असून, आता ग्रामपंचायतीतील अपहार महागात पडणार आहे.

जिल्हात अनेक मोठ्या महसूली ग्रामपंचायती आहेत. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. याबरोबरच अनेक अपहाराच्या घटना आणि गुंतलेली रक्‍कम यात दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही वर्षांत या प्रकारणांमध्ये वाढ झाल्याने ग्रामपंचायत प्रशासनाचे आर्थिक नुकसान झाले आहे. ग्रामपंचायतीच्या कलम 19 खाली या प्रकारच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. हे प्रकार टाळण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास विभागातर्फे विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना सीईओ यांनी दिल्या.

नव्या परिपत्रकानुसार ग्रामपंचायत निधीचा अपहार होऊ नये, म्हणून ग्रामपंचायतींनी खालील बाबींचे कटाक्षाने पालन करणे आवश्‍यक आहे. कोणतीही रक्‍कम अदा करताना संबंधित पुरवठादार, ठेकेदार यांचे पक्‍के बिल घेऊन बिलावरील नोंदींची खातरजमा करूनच साहित्य घ्यावे लागणार आहेत. व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी धनादेश योग्य पद्धतीने करावा लागणार आहे. तसेच, यापुढे कोणत्याही प्रकारचे विकासकामे करताना प्रथम ग्रामसभा घेऊन ठरावाद्वारे कामांची निश्‍चिती करावी लागणार आहे.

ग्रामपंचायतीत वाढलेल्या अपहारामुळे ग्रामपंचात प्रशासनाचे मोठे नुकसान होत होते. हे प्रकार वाढल्यामुळे त्यांच्यावर आळा बसविण्यासाठी ग्रामपंचायत विभागातर्फे परिपत्रक काढण्यात आले आहे. याची काटेकोर अंमलबजावणी संबंधितांना करावी लागणार आहे.
– संदिप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत विभाग जिल्हा परिषद

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.