पुणे -राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाच्या दोन वर्षे कालावधीच्या 23 पदविका अभ्यासक्रमात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थी व्यवसाय पदवी (बॅचरल ऑफ व्होकेशन अर्थात बी. व्होक) अभ्यासक्रम प्रवेशासाठी पात्र राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
व्यवसाय शिक्षण मंडळाशी राज्यात 1265 संलग्नित संस्था आहेत. या संस्थेमार्फत काही तास, सहा महिने, एक वर्ष व दोन कालावधीचे अर्धवेळ आणि पूर्णवेळ असे 365 पदविका (डिप्लोमा), प्रगत पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहेत. त्यातून विद्यार्थ्यांना व्यावसासिक प्रशिक्षण देण्यात येत आहे.
मंडळाच्या अभ्यासक्रमांचा मूळ उद्देश हा युवक-युवतींना रोजगार व स्वयंरोजगारक्षम बनविणे आहे. तथापि, मंडळाच्या अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधीदेखील उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने पाऊल उचलले आहे. त्याचाच एक भाग म्हणून या अभ्यासक्रमांना उच्च शिक्षणाच्या समकक्षता निश्चित करण्यास मान्यता देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
त्यापार्श्वभूमीवर “टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ या संस्थेने मंडळाच्या दोन वर्षे कालवधीच्या 23 पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पात्र केले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाची अभिमत विद्यापीठ म्हणून मान्यता असलेल्या “टाटा’ संस्थेत प्रवेश मिळणार आहे. या अभ्याक्रमसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या प्रवेशासाठी अर्ज करण्याची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाचे संचालक योगेश पाटील यांनी दिली.
23 पदविका कोणत्या?
हेल्थकेअर, ऍग्रिकल्चर, हॉस्पिलिटी, टुरिझम, स्पोर्टस, मीडिया ऍन्ड इंटरटेटमेंट, कॉम्प्युटर सायन्स या क्षेत्रांतील 23 पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना व्यवसाय पदवीसाठी प्रवेश मिळणार आहे.