शिलॉंग- नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) चे अध्यक्ष कॉनरॅड के संगमा यांनी शुक्रवारी मेघालयाचे राज्यपाल फागु चौहान यांची भेट घेतली आणि या राज्यात सरकार स्थापन करण्याचा दावा केला. 60 सदस्यीय विधानसभेत आपल्या बाजूने 32 आमदारांसह पूर्ण बहुमत असल्याचा दावा त्यांनी केला आहे पण या संबंधातील तपशील देण्यास त्यांनी नकार दिला आहे.
राजभवनात जाण्यापूर्वी पत्रकार परिषदेला संबोधित करताना संगमा म्हणाले, “आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे. भाजपने आधीच पाठिंबा दिला आहे. इतर काहींनीही पाठिंबा दिला आहे. तथापि या निवडणुकीत भाजपने केवळ दोन जागा जिंकल्या आहेत. आणि त्यांनी एनपीपीच्या विरोधात प्रचार केला होता.
27 फेब्रुवारी रोजी मतदान झालेल्या 59 मतदारसंघांपैकी 26 जागा जिंकून एनपीपी हा मेघालयातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. भाजप, एचएसपीडीपी आणि पीडीएफ यांनी प्रत्येकी दोन जागा जिंकल्या, तर दोन अपक्ष उमेदवारही विजयी झाले आहेत.
या आधी कॉनराड के संगमा सरकारमध्ये एनपीपीचा सहयोगी असलेल्या युडीपी पक्षाने 11 जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून स्थान मिळवले आहे. या निवडणुकीत कॉंग्रेस आणि तृणमुल कॉंग्रेसने प्रत्येकी पाच जागा जिंकल्या आहेत.