Farmer Protest Updates: चर्चा पुन्हा ‘निष्फळ’! जाणून घ्या काय झालं 4 तासाच्या चर्चेत

पुढची फेरी 19 जानेवारीला

नवी दिल्ली – शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये चर्चेची आज झालेली नववी फेरी निष्फळ ठरली. त्यामुळे किमान आधारभूत किंमत आणि कृषी कायद्यांवरून निर्माण झालेली कोंडी कायम राहिली. या पुढील चर्चेची फेरी 19जानेवारीला दुपारी बारा वाजता होणार आहे.

या चर्चेतून निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय घेतल्यानंतर झालेली ही चर्चेची पहिलीच फेरी होती. सरकारच्या वतीने चर्चेत कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर, रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि राज्यमंत्री सोम प्रकाश सहभागी झाले होते. 40 शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी त्यांनी सुमारे चार तास चर्चा केली. चर्चेपुर्वी तोमर यांनी खुल्या मनाने चर्चा करणार असल्याचे सांगितले होते.

कृषीमंत्री तोमर यांनी बैठकीनंतर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. आम्ही सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयाला बांधील आहोत. ज्यावेळी समिती चर्चेला बोलवेल त्यावेळी आम्ही बाजू मांडू, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, सरकारला 19 जानेवारीला होणाऱ्या चर्चेत तोडगा निघेल, अशी आशा आहे.

शेतकरी संघटनांना केवळ सरकारशी चर्चा करायची आहे, त्याला आमची कोणतीही हरकत नाही. मात्र सर्वोच्च न्यायलयाने नियुक्त केलेली समिती आपले काम सुरू ठेवेल. राहुल गांधी यांच्या टीकेवर भाष्य करताना ते म्हणाले, राहुल यांना त्यांच्याच पक्षाचे लोक हसत असतात. या सुधारणा या कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात होत्या. सरकारला थंडी वाऱ्यात निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता वाटत आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले, तीन कृषी कयदे रद्द करणे आणि किमान आधारभूत किंमतीला कायदेशीर संरक्षण हे दोन मुद्दे तसेच राहीले. आम्ही सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीकडे जाणार नाही. आम्ही केवळ केंद्र सरकारशी चर्चा करू.

मोदी सरकारविरोधात शेतकरी करत असलेल्या सत्याग्रहात जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केले. कॉंग्रेस आज शेतकरी अधिकार दिवस पाळला असून त्या दिवशी सर्व राज्यांच्या राजधानीत निदर्शने केली. नवे कृषी कायदे शेतकऱ्यांना संपवणारे आहेत. त्यांना रोखले नाही तर तीच भूमिका अन्य क्षेत्रातही राबवतील. नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांबाबत आदर नाही. शेतकऱ्यांना कसलेही भय नाही अशी टीका त्यांनी केली.

दरम्यान, लखनौमध्ये राजभवनकडे निदर्शनासाठी निघालेले कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजयकुमार लल्लू आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. हरियाणात राजभवनाकडे निदर्शने करण्यासाठी निघालेल्या कॉंग्रेस नेते भूपिंदरसिंग हुडा यांच्या सह कार्यकत्यांना अटक केली. पोलिसांनी मार्ग रोखून धरले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.