ब्रिटनमध्ये नव्या करोनाचा “कहर’, 15 हून अधिक देशांनी केली प्रवासबंदी; भारत सरकार म्हणतं…

नवी दिल्ली – करोना व्हायरसच्या नव्या प्रकाराने (स्ट्रेन) ब्रिटनमध्ये धुमाकूळ घातला आहे. नवा व्हायरस आधीच्या व्हायरसपेक्षा 70 टक्यांनी अधिक वेगाने पसरत असल्याचे निदर्शनास आले आहे. करोनाच्या नव्या लाटेमुळे ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा कडक लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तेथील परिस्थिती लक्षात घेता जगभरातून 15 हून अधिक देशांनी विमान प्रवासावर निर्बंध घातले आहेत.

युरोपमधून भारतात येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्यात यावी, असी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केली आहे. मात्र, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देशात अलर्ट जारी करण्यात आला आहे, घाबरून जाण्याचे काही कारण नाही असे सांगण्यात आले आहे.

“केंद्र सरकार अलर्ट मोडवर आहे. गेल्या वर्षभर सरकारने देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक निर्णय घेतल्याचे तुम्ही पाहिले आहे. काय करावे आणि काय करू नये याची पूर्ण कल्पना सरकारला आहे. जनतेने घाबरण्याचे काही कारण नाही.’ असे सोमवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन डाॅ. हर्षवर्धन यांनी सांगितले आहे.

आरोग्य मंत्रालयाने करोनाच्या नव्या प्रकाराबद्दल चर्चा आणि उपाययोजना करण्यासाठी आज बैठकीचे आयोजन केले आहे. आरोग्य सेवेचे महासंचालक या बैठकीचे नेतृत्व करणार आहेत. तर एम्स, आयसीएमआर, डब्ल्यूएचओचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

ब्रिटनमध्ये हाहा:कार –

नव्या व्हायरसमुळे ब्रिटनमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पंतप्रधान बोरिस जाॅन्सन यांनी करोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणामुळे दक्षिण इंग्लंडमधील बाजार ख्रिसमस आधीच बंद करण्याची घोषणा केली आहे. तसेच चतुर्थ श्रेणीच्या कडक लाॅकडाऊनची घोषणाही जाॅन्सन यांनी केली आहे. दक्षता म्हणून कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलॅंड, बेल्जियम, ऑस्ट्रिया, चिली, बल्गेलिया आणि दक्षिण अरबकडून ब्रिटनच्या प्रवासावर बंदीची घोषणा करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.