राजगुरूनगर – राजगुरूनगर हुतात्मा राजगरू यांचे जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारकी करण्यासाठी जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे करू. राज्यपालांनी हुतात्मा राजगुरू यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न करावेत. आपले राज्यपाल म्हणतील ते सरकार करायला तयार असते. राज्यात आता त्यांचे नवे सरकार सत्तेवर आहे. राज्यपालांनी आदेश देत राजगुरू स्मारकासाठी निधी मिळवून द्यावा, अशी मागणी यावेळी आमदार दिलीप मोहिते यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली.
आमदार मोहिते म्हणाले की, मागील 5 वर्षाच्या काळात सरकारने एक रुपयाचाही निधी दिला नव्हता. स्मारकाचे काम रखडले. पुन्हा आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा हुतात्मा राजगुरू जन्मस्थळवाड्यावर जाण्यासाठी भीमानदीवर 5 कोटी रुपयांचा पूल मंजूर केला. आम्ही पोकळ प्रेम करून अभिवादन करीत नाही, आश्वासने देत नाही तर विकास करून दाखवतो, असा चिमटा त्यांनी विरोधकांना काढला.
खासदार डॉ. कोल्हेंचा शब्द…
हुतात्मा राजगुरू स्मारकासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मी शब्द देतो स्मारकासाठी जेजे करावे लागेल तेते करू हुतात्म्यांच्या बलिदानाची जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे. राष्ट्र प्रथम हा संस्कार प्रत्यकाने जोपासला पाहिजे, असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिले.