सिमला – हिमाचल प्रदेशातील कॉंग्रेसच्या पाच आमदारांविरोधात राज्यपालांना धक्काबुक्की केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभेचे सभापती विपीन परमार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ते पाऊल उचलले.
हिमाचल विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कॉंग्रेस आमदारांनी केलेल्या गोंधळामुळे राज्यपाल बंडारू दत्तात्रय यांनी अभिभाषण आटोपते घेतले. त्यानंतर ते विधानसभेतून जात असताना कॉंग्रेस आमदारांनी त्यांना कथितपणे धक्काबुक्की केली. त्यामुळे कॉंग्रेसच्या पाच आमदारांना अधिवेशन समाप्त होईपर्यंत विधानसभेतून निलंबित करण्यात आले.
दरम्यान, कॉंग्रेसने उपसभापती हंसराज यांनीच आपल्या आमदारांना धक्काबुक्की केल्याचा प्रत्यारोप केला आहे. गुन्हा दाखल झालाच असेल; तर आम्ही जामीनासाठी प्रयत्न करणार नाही. त्याऐवजी अटकेला सामोरे जाऊ, अशी प्रतिक्रिया निलंबित आमदारांकडून देण्यात आली.