मुंबई – मध्य प्रदेशातील भाजपच्या वरिष्ठ नेत्या आणि लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचे नाव महाराष्ट्राच्या पुढील राज्यपालपदासाठी शर्यतीत आहे. यावरून दिल्लीसह राज्यात जोरदार राजकीय चर्चा रंगली आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि उत्तर प्रदेशच्या माजी राज्यपाल आणि गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदी बेन पटेल यांचीही नावे चर्चेत आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्र लिहून पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण होणार हे येत्या काही दिवसांतच समजणार आहे. सुमित्रा महाजन यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. सुमित्रा महाजन या मध्य प्रदेशमधील भाजपच्या ज्येष्ठ नेत्या असून 2014 ते 2019 या काळात त्या लोकसभेच्या सभापती होत्या.
महाराष्ट्रातील चिपळूण येथे जन्म झालेल्या सुमित्रा महाजन यांच्या नावाची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदासाठी पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे. महाजन यांचे नातेसंबंध महाराष्ट्राशी असल्याने भाजपचे शिष्टमंडळ त्यांच्या नावासाठी सकारात्क असल्याचे सूत्रांकडून समजते. तसेच यापूर्वी महाविकास आघाडी आणि भगतसिंह कोश्यारी यांच्यात अनेक वेळा वाद निर्माण झाले होते. त्यावेळी महाविकास आघाडीकडून “कोश्यारी हटाव’ची मागणी करण्यात आली होती. त्यावेळीही सुमित्रा महाजन यांचे नाव चर्चेत आले होते.
दुसरीकडे पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे महाराष्ट्राचे पुढील राज्यपाल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कॅप्टन यांनी काही काळापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला असून, त्यांनी त्यांचा पक्ष पंजाब लोक कॉंग्रेस भाजपमध्ये विलीन केला आहे.
लष्करातून निवृत्त झालेल्या कॅप्टन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगले संबंध आहेत. अलीकडेच त्यांचा भाजपच्या सदस्यीय राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, 31 जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार असून, त्यापूर्वीच महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळण्याची शक्यता आहे.