रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षाची निवडणूक कधी घेताय?

राज्यपालांनी विचारणा केल्याने सरकारची अडचण

राज्यपाल आणि ठाकरे सरकार यांच्यातील संबंध ताणलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला नुकतेच पत्र पाठवले असून त्यामध्ये रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षाची निवडणूक कधी घेताय, अशी विचारणा केली आहे. राज्यपालांनी यासंदर्भात विचारणा केल्याने सरकारची अडचण झाली आहे.

बुधवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यासदंर्भात चर्चा झाली. विधिमंडळ सचिवालयास राजभवनने पत्र पाठवले आहे. त्यात विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीसंदर्भात विचारणा केली आहे, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली. मागच्या आठवड्यात राज्यपालांबाबत विमान अवमान प्रकरण घडले होते.

त्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी आता नियमांवर बोट ठेवत विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीसंदर्भात सरकारकडे विचारणा केली आहे. काँग्रेसच्या नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी नवा अध्यक्ष नेमला जाणार आहे. विधानसभा अध्यक्षाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने होते. परिणामी सत्ताधारी पक्षाला आपले आहे ते संख्याबळ दाखवण्यासंदर्भात मोठी खबरदारी घ्यावी लागत असते. दि.१ मार्चपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. विधानसभा उपाध्यक्ष हे अधिवेशन पार पाडतील, पुढच्या अधिवेशनात किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटी अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा सरकारचा घाट होता.

राज्य सरकारकडे १७० आमदारांचे संख्याबळ आहे. राज्यपालांचे पत्र सचिवालयास प्राप्त झाले आहे. निवडणुकीबाबत त्यात विचारणा केली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चासुद्धा झाली. मात्र निवडणुकीबाबत कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत त्याची निश्चिती होईल, असे एका मंत्र्याने सांगितले. चालू अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्याबाबत तारीख निश्चित करायची व राज्यपालांना कळवायची. त्याच पत्रासोबत विधान परिषदेच्या १२ नामनियुक्त जागांची शिफारस मंजूर करा असे राज्यपाल यांना सुनवायचे असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.