नागरिकत्व दुरुस्ती विधेयकासाठी सरकार कटिबद्ध – आसाममधील सभेत मोदींची ग्वाही

सिल्चर (आसम)- लोकसभा निवडणूकांनंतर “एनडीए’ सरकार सत्तेवर आल्याबरोबर नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर करून घेण्यास भाजप कटिबद्ध आहे, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिली. या दुरुस्ती विधेयकासठी समाजातील सर्व गटांशी विचार विमर्श केला जाईल आणि आसामी समुदायाच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली जाईल, असे आसाममधील निवडणूक प्रचार सभेमध्ये बोलताना मोदींनी सांगितले. य नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचा नव्याने विचार करताना आसामी भाषा, संस्कृती आणि अस्मितेचे पूर्ण संरक्षण केले जाईल, याची हमी देखील मोदींनी दिली.

मोदी सरकारने मांडलेले नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये 8 जानेवारीला मंजूर झाले होते. मात्र ते राज्यसभेत मंजूर होऊ शकले नव्हते. हे विधेयक 3 जूनपर्यंत वैध असणार आहे.

कॉंग्रेसने स्वातंत्र्याच्यावेळी झालेल्या फाळणीप्रसंगी पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांचा विचारच केला नाही, अशी टीका पंतप्रधानांनी केली. पाकिस्तानमधील मूलतत्ववाद्यांनी हिंदू अल्पसंख्यांकांचा छळ केला. त्यासाठी कॉंग्रेस जबाबदार नाही का ? बांगलादेश आणि पाकिस्तनात मंदिर आणि गुरुद्वारांमध्ये जाणारे लोक भारतात येतात. मात्र कॉंग्रेसने त्यांना आपल्याच भूमीत परदेशी करून टाकण्याचे पाप केले. पाकिस्तानात महिलांना आजही छळाला सामोरे जवे लागते आहे, असे मोदी म्हणाले.

केंद्रात पुन्हा सत्तेवर आल्यानंतर कॉंग्रेस, एआययुडीएफ आणि अन्य विरोधकांच्या “महामिलावट’ आघाडीने कितीही विरोध केला तरी महिलांना न्याय मिळण्यासाठी तिहेरी तलाक बंदीचे विधेयक मंजूर करण्याचा सरकारचा जोरदार प्रयत्न असेल, असेही त्यांनी सांगितले.

सध्याच्या लोकसभा निवडणूकीमध्ये देशभरात भाजपला अनुकूल लाट निर्माण झाली आहे. केंद्रातील सरकार कोणते असावे, याचा निर्णय जनतेने घेतला आहे त्यामुळे विरोधकांचे तग धरणेच अवघड बनणार आहे. आसाममधील लोकसभेच्या पाचही जागांवर भाजपचा विजय होईल, असा विश्‍वासही मोदींनी व्यक्‍त केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.