सरकारी मदतीची वाट पाहणार नाही – सभापती माने

इंदापूर तालुक्‍यात मागणी तेथे चारा छावणी सुरू करणार

रेडा – इंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे पशुधन जगविण्यासाठी आम्ही सरकार मदतीचे वाट बघत बसणार नाही. मागणी होईल तेथे चारा छावणी सुरू करू. यामुळेच निरवांगी पाठोपाठ आता रेडणी गावातही चारा छावणी सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे जिल्हा परिषद आरोग्य, बांधकाम विभागाचे सभापती प्रवीण माने यांनी सांगितले. रेडणी येथे प्रस्तावित जागेची पाहणी माने यांनी स्थानिक शेतकऱ्यांसह केली.

महाराष्ट्र शासन व सोनाई परिवाराच्यावतीने चारा छावण्या इंदापुरात चालविल्या जात आहेत. याबाबत माने यांनी सांगितले की, राज्यभरातील शेतकरी मान्सूनची वाट पाहत आहे. दुष्काळीस्थितीतच पावसाने ओढ दिली आहे. यातून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पीकपाणी हातचे गेल्याने धान्याची टंचाई असताना पुशधनाला चारा कसा घालणार, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना भेडसावत असल्यानेच तालुक्‍यात ठिकठिकाणी चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या प्रमुख व्यवसाय पशुपालन आहे. यामध्ये दुभत्या गायी तसेच इतर लहान मोठी जनावरे घरटी मोठ्या संख्येने आहेत. परंतु, दुष्काळाने गोठ्यातील पशुधन सुरक्षित रहावे, याकरिता चारा पुरवठ्याची जबाबदारी शासनाच्या मदतीने सोनाई परिवाराने उचलली आहे. चारा छावणीत येणाऱ्या मोठ्या जनावरांना दररोज 18 किलो, लहान जनावरांना 9 किलो हिरवा चारा तसेच मोठ्या जनावरांना आठवड्याला 3 व लहान जनावरांना एक किलो पशुखाद्य यासह पाण्याची व्यवस्था सोनाई परिवारामार्फत करण्यात येणार असल्याचेही माने यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.