विरोध करणाऱ्यांचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली- सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना त्रास दिला जात असून अशा लोकांच्या मदतीसाठी एक सत्य फंड तयार केला जात आहे. यात जमा होणारी रक्कम अशा लोकांच्या मदतीसाठी वापरली जाईल, असे ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी म्हटले आहे.

न्यायालयाचा अवमान प्रकरणात दोषी ठरविल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने भूषण यांना एक रूपया दंडाची शिक्षा केली होती. दंड न भरल्यास तीन महिने कैद आणि तीन वर्षे प्रॅक्‍टीस करता येणार नाही असे शिक्षेचे स्वरूप होते. आज भूषण यांनी हा दंड भरला. त्यानंतर ते बोलत होते.

प्रशांत भूषण म्हणाले, दंड जमा केला याचा अर्थ असा नाही की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य आहे. आम्ही आजच या प्रकरणात फेरविचार याचिका दाखल करणार आहोत. भारतात आज अभिव्यक्ति स्वातंत्र्य धोक्‍यात आहे. जे लोक सरकारच्या विरोधात बोलतात त्यांचे तोंड बंद करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. सरकारच्या विरोधात बोलल्यामुळेच उमर खालिदला अटक करण्यात आली. सीताराम येचुरी आणि अन्य नेत्यांना त्रास दिला जातो आहे.

अशा लोकांच्या मदतीसाठी सर्वसामान्यांकडून एक एक रूपया गोळा करून सत्य फंड तयार केला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.