राज्यातील शासकीय तंत्रनिकेतन बंद होणार नाही – उदय सामंत

सर्व तंत्रनिकेतन इमारतींचे होणार स्ट्रक्‍चरल ऑडिट
मुंबई : राज्यातील एकही शासकीय तंत्रनिकेतन बंद करण्याचा शासनाचा विचार नसून अस्तित्वात असलेली तंत्रनिकेतने बळकट करण्यावर भर देण्यात येणार आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. तसेच राज्यातील अनेक शासकीय तंत्रनिकेतनच्या इमारती या तीस वर्षे जुन्या आणि जीर्ण झालेल्या आहेत. या सर्व इमारतींच्या बांधकामाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यात यावे, असे निर्देशही त्यांनी बुधवारी दिले.

राज्यातील तंत्रशिक्षण विभागाच्या कामाचा आढावा उदय सामंत यांनी विधान भवनात घेतला. त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील सर्वच शासकीय तंत्रनिकेतनच्या इमारतीं जीर्ण झाल्या आहेत. या इमारतींचे स्ट्रक्‍चरल ऑडिट गरजेचे असू हे स्ट्रक्‍चरल ऑडिट दुसऱ्या विभागाकडून वा अन्य यंत्रणेकडून न करता त्या त्या जिल्ह्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या स्थापत्य अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांकडूनच करून घ्यावे, असे सामंत यांनी सांगितले.

राज्यातील शासकीय तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकास गुणांना वाव देण्यासाठी व त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे या हेतूने राज्यात प्रत्येक विभागात एक याप्रमाणे सहा विभागात तसेच रत्नागिरी व कोल्हापूर येथे प्रत्येकी एक याप्रमाणे आठ शासकीय तंत्रनिकेतनमध्ये टप्प्याटप्प्याने कौशल्य विकासावर आधारित अभ्यासक्रम सुरू करावे तसेच अन्य सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्या, असे निर्देशही उदय सामंत यांनी दिले.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.