लखनौ – केंद्र सरकारने जाहीर केलेल्या मोफत लसीकरणाचा निर्णय उशिरा घेतलेला योग्य निर्णय असल्याचे बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी म्हटले आहे. सरकारने लसीकरणाविषयीच्या राजकारणापासून दूर राहावे आणि प्रत्यक्ष लसीकरणावर लक्ष केंद्रित करावे, अशी सूचनाही मायावती यांनी केली आहे.
करोनाच्या दुसरी लाट अधिक घातक असल्याचे स्पष्ट झाल्यावर सरकारने मोफत लसीकरणाचा निर्णय जाहीर केला. हा योग्य निर्णय उशिरा घेतला गेला. मोफत लसीकरणाची मागणी बसपाच्या वतीने खूप आधीपासून केली होती. आता हे काम परिश्रमपूर्वक पार पाडावे लागेल, असे मायावती यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
लसी नाकारणे आणि दुर्लक्ष करणे अन्यायकारक आहे. ते घातक असू शकते. राजकारण, आरोप-प्रत्यारोप, श्रेयवादापासून दूर राहावे आणि वेगाने लसीकरणावर लक्ष केंद्रित करावे, असे मायावती यांनी म्हटले आहे.