पारनेर -करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने तातडीने उपाययोजना करीत योग्य वेळी लॉकडाऊन जाहीर केल्याने प्रगत राष्ट्रांच्या तुलनेत आपल्या देशात कोरोनाला रोखण्यात चांगले यश आले आहे, ही जमेची बाजू असल्याचे सांगत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नागरिकांनी शासनाचे आदेश पाळत घरीच राहून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी मंगळवारी (दि.14) राळेगण सिद्धी येथे सायंकाळी उशिरा हजारे यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी झालेल्या चर्चेत जिल्ह्यातील करोना बाधित रुग्ण व परिस्थितीची माहिती सिंह यांनी हजारे यांना दिली. लॉकडाऊन काळात अनेक दानशूर लोक हातावर पोट असणाऱ्या गरजू कुटुंबांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत.
या मदतीचे वितरण करताना प्रशासनाला सहकार्य करीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जावे, अशी अपेक्षा हजारे यांनी व्यक्त केली. पोलीस अधीक्षक सिंह म्हणाले, यूपीएससीची तयारी करताना माझ्यासमोर माजी राष्ट्रपती स्व. एपीजे अब्दुल कलाम व अण्णा हजारे ही प्रेरणास्थाने होती. त्या काळात मी कलाम व आपणाविषयी खूप वाचले.आपल्या नगर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली, याचा आनंद वाटतो. आपणाकडून वेळोवेळी मार्गदर्शन घ्यायला मला आवडेल. त्यावर हजारे यांनी करोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर विविध विषयांवर चर्चा करून मार्गदर्शन करू, असा शब्द सिंह यांना दिला. यावेळी हजारे यांनी सिंह यांना विविध पुस्तके भेट दिली.