डुमका – झारखंडच्या डुमका जिल्ह्यात तेथील अधिकाऱ्यांनी एक वेगळाच चमत्कार केला आहे. शाळांना असणारी रविवारची सुटी बदलून ती शुक्रवारी करण्यात आली आहे. जिल्ह्यातल्या 33 टक्के शाळांनी असा प्रकार केला असून ते करण्यापूर्वी कोणाची परवानगीही घेण्यात आलेली नाही. हे सगळे काय प्रकरण आहे याची चौकशी करण्याचे आदेश आता देण्यात आले आहे. विशेष म्हणजे डुमका हे राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे गाव आहे.
या सगळ्या शाळा उर्दु शाळा असून शुक्रवारी सुटी देण्याचे आदेश कोणी दिले नसताना त्यांनी हा निर्णय का घेतला याची चौकशी केली जाते आहे. दरम्यान, याबाबत बोलताना राज्याचे शिक्षण मंत्री जागरनाथ महातो म्हणाले की मुस्लिम लोकसंख्या जास्त असलेल्या भागातील सरकारी शाळांमध्ये हा प्रकार घडला आहे. त्यांच्याकडून अहवाल मागवण्यात आला आहे. दरम्यान, यातही आणखी एक चक्रावणारी माहिती समोर आली आहे.
शुक्रवारी सुटी घेण्याचा आणि रविवारी शाळा सुरू ठेवण्याचा हा प्रकार आजचा नसूून 2015 पासून हे सुरू असल्याचे एका शाळेच्या प्रिन्सिपलनेच म्हटले आहे. शालिनी गुडिया मरांडी हे त्यांचे नाव आहे. तेव्हापासून शुक्रवारी शाळा बंद असते आणि रविवारी सुरू असते अशी धक्कादायक माहिती त्यांनी दिली आहे. शाळेतील बहुसंख्य मुले ही अल्पसंख्य समुदायातील असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.