मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठीच लागणार तीन हजार कोटी

मुंबई : राज्यात अवकाळी पावसाने रब्बी पिकांना मोठा फटका बसला असून केवळ मराठवाड्यातच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी दोन हजार 904 कोटी रुपयांची गरज लागणार आहे. महसूल खात्याच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयाने केलेल्या पाहणीतून ही बाब समोर आली आहे.

अवकाळी पावसाचा फटका मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यतातील 44 लाख 33 हजार 549 शेतकऱ्यांना बसला. सुमारे 41 लाख 49 हजार 175 हेक्‍टर क्षेत्रावरील पिके उद्‌ध्वस्त झाली. हा अहवाल प्रत्यक्ष पाहणी करून बनवण्यात आला आहे. राज्य प्रशासनाला हा अहवाल बुधवारी सादर करण्यात आला, अशी माहिती विभागीय आयुक्त पराग सोमण यांनी दिली.

यंदा खरीपाच्या हंगामात सुरवातीला पावसाने पाठ फिरवली. कशीबशी जगवलेल्या उभ्या पिकाला नंतर आलेल्या अवकाळीने अक्षरश: उद्‌ध्वस्त केले. पिकेच नाही तर शेतकरीच यात देशोधडीला लागण्याची वेळ आली. याबाबत सोमण म्हणाले, या भागातील शेतकऱ्यांसाठी दोन हजार 904 कोटी 36 लाख रुपयांची गरज आहे. बहुतांश प्रकरणात कापणी आधीच आलेल्या पावसाने उभी पिके शेतातच आडवी केली. नांदेड, बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले असून तेथे नुकसानभरपाई साठी प्रत्येकी चारशे कोटी रुपयांची गरज आहे.

सिंचनाखाली नसलेल्या जमीनीवरील पिकांसाठी प्रतिहेक्‍टर सहा हजार 800 रुपये तर सिंचनाखालील क्षेत्राला प्रतिहेक्‍टर 13 हजार रुपये तर फळबागांना 13 हजार रुपये नुकसानभरपाई दिली जाते. या पावसाळ्यात 50 लाख 20 हजार 591 हेक्‍टरवर लागवड झाली. दरम्यान सरकारने, अवकाळी पावसाने उद्‌ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दहा हजार कोटींची मदत जाहीर केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.