डेअरीचालकांना शासनाचा दिलासा

दूध, भुकटी प्रोत्साहन अनुदानाबाबत शासन सकारात्मक

पुणे – राज्यातील दूध आणि दूध भुकटी निर्यात करण्यासाठी सहकारी व खासगी दूध प्रकल्पांना देण्यात येणारे प्रोत्साहनपर अनुदान देण्यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या शिष्टमंडळाने पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांची बुधवारी (दि.29) भेट घेतली. या बैठकीत मंत्री केदार यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे दूध डेअऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या बैठकीला सोलापूरचे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार दीपक साळुंके, यशवंत माने उपस्थित होते.

राज्यातील दूध उत्पादनाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना खरेदी दरात योग्य अशी वाढ देण्याबाबत जुलै 2018 रोजी शासनाने निर्णय घेतला होता. यामध्ये दूध भुकटी व दुधाची निर्यात करण्यासाठी सहकारी व खासगी दूध प्रकल्पांना 50 आणि प्रति लिटर 5 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची योजना कार्यान्वित केली होती. ही योजना ऑगस्ट ते ऑक्‍टोबर 2018 पर्यंत राबवली. त्यानंतर 8 मार्च 2019 पर्यंत योजनेस मुदतवाढ देताना 5 रुपये अनुदानाचे 3 रुपये केले. यामध्ये लाभार्थ्यांचे अनुदान शासनाकडे प्रलंबित आहे.

राज्यातील विविध दूध डेअऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे अनुदान थकीत असल्याने ते त्वरित मिळावे याकरिता हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्यातील डेअरीचालकांनी आग्रही मागणी केली होती. मात्र, मंत्रीमंडळाचा विस्तार झाला नसल्याने विस्तारानंतर याबाबतचा निर्णय घेऊ, अशी राज्य सरकारने भूमिका घेतली होती. आता मंत्रीमंडळ विस्तार झाल्यानंतर दुग्धव्यवसाय विकासमंत्री सुनील केदार यांची सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यात दूध डेअऱ्यांना अडचणीचे ठरणारा हा प्रश्‍न मार्गी लावण्याची आग्रही मागणी केली.

या चर्चेदरम्यान हे अनुदान देण्याकरिता अधिकाऱ्यांना संबंधित अहवाल सादर करण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील डेअरी चालकांना दिलासा मिळाला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.