मुंबई – करोना संसर्गामुळे लांबलेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा अखेर उद्या होणार आहे. राज्यात करोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्यात हजारो विद्यार्थी परीक्षा देणार असल्यामुळे चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एमपीएससी परीक्षार्थींसाठी नियमावली जाहीर केली आहे.
सकाळी 10 ते दुपारी 12 व दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अशा दोन सत्रात हा परीक्षा घेण्यात येणार आहे. कोरोना काळात ही परीक्षा होत असल्यानं परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी नियम करण्यात आले आहेत.
परीक्षा उपकेंद्रामध्ये प्रवेश करताना तीन पदरी कापडाचा मास्क परिधान करणे अनिवार्य आहे. आयोगाकडून परीक्षा कक्षामध्ये मास्क, हातमोजे व सॅनिटाईझरची लहान पिशवी असलेले प्रत्येकी एक किट उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्याचा वापर दोन्ही सत्राकरीता करणे अनिवार्य आहे. पेपरच्या कालावधीत हात सतत सॅनिटाईझ करणे आवश्यक आहे.
कोरोनासदृश्य लक्षणे जसे की ताप, सर्दी, खोकला इत्यादी दिसून येत असल्यास संबंधित परीक्षा उपकेंद्रावरील पर्यवेक्षकीय अधिकारी /कर्मचारी यांना त्वरीत कळवावे. अशा उमेदवारांना मुखपट, हातमोजे, फेस शिल्ड, मेडिकल गाऊन, मेडिकल शु कव्हर, मेडिकल कॅप, इत्यादी बाबी समाविष्ट असलेले पीपीई किट उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच, त्यांची स्वतंत्र परीक्षा कक्षामध्ये बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे.
शारीरिक/परस्पर अंतर राखण्याच्या अनुषंगाने परीक्षा उपकेंद्रावरील उचित माहिती फलक, सांकेतिक चिन्हे, भित्तिपत्रिका इत्यादी वरील सूचनांचे कटाक्षाने पालन करावे. परीक्षा संपल्यानंतर परीक्षा उपकेंद्राबाहेर जाताना शारिरीक/परस्पर अंतर राखणे उमेदवारांना अनिवार्य आहे. वापरलेले टिश्यु पेपर, मुखपट, हातमोजे, संनिटाईझ पाऊच, इत्यादी वस्तू परीक्षा उपकेंद्रावरील आच्छादित कुंडीमध्ये टाकावेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेला बसणाऱ्या परीक्षार्थींनी आयोगाच्या वेबसाईटवरुन प्रवेशपत्र डाऊनलोड करुन प्रिंटआऊट काढून सोबत ठेवावी. त्यासोबतच आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड आणि इतर ओळखपत्र ज्याला आयोगानं मान्यता दिलीय त्याची झेरॉक्स प्रत सोबत ठेवावी.