नवी दिल्ली : स्वीस बॅकांमध्ये ज्या भारतीय नागरीकांची खाती आहेत त्यांची यादी स्वीस बॅंकेने भारत सरकारला दिली आहे पण ती जाहीर करण्यास अर्थमंत्रालयाने आज पुन्हा एकदा नकार दिला आहे.
भारत आणि स्वीत्झर्लंड या दोन देशांमध्ये जो करविषयक गुप्तता करार झाला आहे त्यामुळे ही यादी जाहीर करता येत नाही असे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे. विदेशातून आत्तापर्यंत नेमका किती काळापैसा भारतात आणण्यात आला आहे याचीही माहिती देण्यास अर्थमंत्रालयाने नकार दिला आहे.
हा नकार मात्र कोणत्या कारणाने देण्यात आला आहे हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. माहितीच्या अधिकारात अर्थमंत्रालयाकडे ही माहिती मागण्यात आली होती. भारताने स्वीस सरकारशी जो करार केला आहे त्यानुसार स्वीस बॅंकांमध्ये ज्या भारतीयांची खाती आहेत त्याची माहिती भारत सरकारला दिली जाते.
गेल्या सप्टेंबर महिन्यात भारताला याची पहिली यादी देण्यात आली होती.
भारतीय नागरीकांनी विदेशात मोठ्या प्रमाणावर काळापैसा ठेवला असल्याचा दावा भारतीय जनता पक्षातर्फे वारंवार करण्यात आला आहे. पण हा पैसा नेमका किती आहे याचाही अंदाज आत्तापर्यंत घेता आलेला नाही.
यापैकी किती काळापैसा भारतात परत आणण्यात आला आहे याचीही माहिती सरकारकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे हा काळ्यापैशाचा विषय आणखी काही काळ तरी गुलदस्त्यातच राहण्याची चिन्हे आहेत.