नवी दिल्ली – भारताने आता अवकाश युद्धाची (स्पेस वॉर) तयारी सुरू केली असुन सैन्याचे सामर्थ्य वाढवण्यासाठी केंद्र सरकारने नव्या संशोधन संस्थेच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. संरक्षण अंतराळ संशोधन संस्था (डीएसआरओ) असे या संस्थेचे नाव असणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील सुरक्षेसाठीच्या कॅबिनेट समितीने डीएसआरओच्या स्थापनेला मंजुरी दिल्याचे संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या माहितीत सांगितले आहे. उच्च क्षमतेची हत्यार आणि तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम डीएसआरओ करेल अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
2020 पर्यंत अंतराळ दलाची निर्मिती करण्याची घोषणा या आधीच अमेरिकेकडून करण्यात आली आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे चीन अस्वस्थ आहे. त्यामुळे लवकरच चीनकडूनही याबद्दल मोठी घोषणा केली जाऊ शकते. त्यातच भारतानेही आपन या क्षेत्रात आपले सामर्थ्य वाढवण्यात प्रयत्नशील असल्याचे दाखवत आपल्या नविन संशोधन संस्थेची स्थापना केली आहे.
संरक्षण अंतराळ संशोधन संस्थेच्या स्थापनेचा निर्णय सरकारने नुकताच घेतल्याची माहिती संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिली. या संस्थेला आकार देण्यासाठी वेगाने पावल उचलली जात आहेत. या संस्थेला लवकरच वैज्ञानिकांचे एक पथक दिले जाईल. हे पथक तिन्ही दलांसोबत मिळून काम करेल. ही संस्था संरक्षण अंतराळ संस्थेला (डीसीए) संशोधन आणि विकासात सहकार्य करेल. डीसीएमध्ये तिन्ही दलांचे सदस्य आहेत.