हडपसर, दि. 3 (प्रतिनिधी) –आताचे सरकार हे सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, गोरगरिबांचे आहे. नगरसेवक नाना भानगिरे हा जरा वेगळा माणूस आहे. त्याने माझ्या प्रेमापोटी माझे नाव उद्यानाला दिले असावे. मात्र, आता ते बदलून उद्यानाला धर्मवीर आनंद दिघे साहेब, असे नाव देण्यात आले आहे. लोकहिताची कामे केल्यामुळेच तीन वेळा नाना नगरसेवक झाला. स्वत:च्या खिशात हात घालून जनतेच्या उपयोगी पडण्याचे काम नगरसेवक नाना भानगिरे करत आहे. असेच काम करत मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
महानगरपालिकेच्या वतीने हांडेवाडी रोड येथे उभारण्यात आलेल्या हिंदूहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदानाच्या लोकार्पण कार्यक्रमात शिंदे बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, खेळांना प्राधान्य व खेळाडूंना योग्य संधी मिळवून दिली पाहिजे, आपल्या मुलांमधील क्रीडागुणांना वाव द्यायला हवा.त्यांच्यामध्ये भरपूर क्षमता आहे, असे झाल्यास स्थानिक पातळीवरील मैदानावरूनही जागतिक दर्जाचे खेळाडू निर्माण होऊ शकतात.
यावेळी माजी मंत्री उदय सामंत, तानाजी सावंत, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार दिलीप लांडे, शरद सोनवणे, आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्तक्त मनपा आयुक्त विलास कानडे, कार्यक्रमाचे आयोजक माजी नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे, संतोष भानगिरे, बाळासाहेब भानगिरे, अभिमन्यू भानगिरे आदी उपस्थित होते.
“शेवटपर्यंत शिंदेसाहेबांचा कट्टर समर्थक म्हणून राहीन’
स्वखर्चाने उभारण्यात आलेल्या उद्यानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव दिले याबद्दल दिलगिरी व्यक्त करून अधिक बोलताना नाना भानगिरे म्हणाले की, मला कोणत्याही पदाची लालसा नाही. माझ्या प्रभागातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी साहेबांनी मला निधी उपलब्ध करून दिला. तत्काळ मदत केली म्हणून येथील पाणी प्रश्न मार्गी लागला. त्यामुळे मरेपर्यंत शिंदे समर्थक म्हणून काम करेन. मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आमच्या महंमदवाडी गावचे नाव बदलून ते महादेववाडी करावे, तसेच पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी ही यावेळी माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.